अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी साथ द्या!; सुनेत्रावहिनींचे सोमेश्वरच्या सभासदांना भावनिक आवाहन
कारखाना हा कुणा एका व्यक्तीची मालमत्ता नाही, तर हजारो शेतकरी कुटुंबांच्या संसाराचा आधार’; विकास, सभासदांचे हित आणि भविष्यातील आव्हानांवर भर

अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी साथ द्या!; सुनेत्रावहिनींचे सोमेश्वरच्या सभासदांना भावनिक आवाहन
‘कारखाना हा कुणा एका व्यक्तीची मालमत्ता नाही, तर हजारो शेतकरी कुटुंबांच्या संसाराचा आधार’; विकास, सभासदांचे हित आणि भविष्यातील आव्हानांवर भर
बारामती वार्तापत्र
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत असताना, कारखान्याचे भवितव्य, सभासदांचे हित आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विकासवारसा पुढे नेण्यासाठी सभासदांनी साथ द्यावी, असे भावनिक आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी केले. अजितदादांनी शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असून, त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दादांच्या आठवणींना उजाळा; जनतेच्या प्रेमाचे ऋण विकासातून फेडण्याचा निर्धार
श्री सोमेश्वराच्या चरणी वंदन करून आणि कनेरीच्या मारुतीरायाला नमन करून सुनेत्रावहिनींनी भाषणाला सुरुवात केली. सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय मुकुटराव आप्पा काकडे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्मरण करत त्यांनी अजितदादांना विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक असल्याने त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव प्रत्येकाला होत आहे. मात्र, दादांची शिकवण संकटांवर मात करून पुढे जाण्याची होती. त्यांच्या विचारांचा आणि विकासकार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण जबाबदारी स्वीकारली आहे. दादांवर प्रेम करणाऱ्या जनतेला पोरके होऊ द्यायचे नाही, हा आपला निर्धार असल्याची भावना सुनेत्रावहिनींनी व्यक्त केली.
प्रचाराच्या निमित्ताने सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातील गावागावांत, वाड्या-वस्त्यांवर आणि शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर अजितदादांच्या आठवणी पुन्हा पुन्हा समोर आल्या. कुणाच्या घरातील छायाचित्रातून, कुणाच्या डोळ्यांतील अश्रूंमधून, तर कुणाच्या आठवणींतून दादा आजही जनतेच्या मनात जिवंत असल्याचे जाणवले. जनतेने दिलेले प्रेम आणि विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
‘कारखान्याचे खरे मालक सभासदच!’
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा केवळ ऊस गाळप करणारा उद्योग नसून हजारो शेतकरी कुटुंबांच्या संसाराचा आधार आहे. कारखान्याशी शेतकरी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक हित जोडलेले आहे. त्यामुळे कारखान्याची प्रगती म्हणजे या सर्वांच्या जीवनमानातील सुधारणा होय, असे सुनेत्रावहिनी म्हणाल्या.
कारखाना हा कुणा एका व्यक्तीची मालमत्ता नसून सभासद हेच त्याचे खरे मालक आहेत, ही भूमिका अजितदादांनी कायम जपली. त्यामुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणांपेक्षा कारखान्याचे हित, सभासदांचे कल्याण आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती यांना प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कारखान्याच्या विकासासाठी काम करण्याची तयारी असलेल्या प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जाण्याची आपली भूमिका असल्याचे सांगताना, कोण आपला आणि कोण परका, अशी विभागणी करण्याऐवजी कारखान्याच्या भवितव्याचा विचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पाणीटंचाई, ऊस उपलब्धता आणि व्यवस्थापनाचे आव्हान
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची संभाव्य कमतरता लक्षात घेता आगामी काळात सोमेश्वर कारखान्यासमोर महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. यंदाच्या गाळप हंगामाबरोबरच पुढील वर्षासाठी ऊस उपलब्धतेचे नियोजन आतापासून करणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर, शेतीचे नियोजन आणि कारखान्याचे सक्षम व्यवस्थापन यावर भर द्यावा लागेल, असे त्यांनी नमूद केले.
ऊस उत्पादक शेतकरी, ऊसाचे उत्पादन आणि कारखान्याची आर्थिक स्थिती या बाबी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जपताना कारखान्याची आर्थिक क्षमता आणि भविष्यातील गरजा यांचाही एकत्रित विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोप-प्रत्यारोपांपेक्षा कामाला प्राधान्य
कारखान्याच्या आर्थिक स्थितीबाबत आणि व्यवस्थापनाबाबत होत असलेल्या आरोपांवर भाष्य करताना सुनेत्रावहिनींनी आरोप-प्रत्यारोपांपेक्षा प्रत्यक्ष कामातून उत्तर देण्याची अजितदादांची शिकवण अधोरेखित केली. कारखान्याचा विकास, सभासदांचे हित आणि शेतकऱ्यांचे आर्थिक बळ वाढविणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थिती समजून घेण्याचे आवाहन त्यांनी सभासदांना केले. निवडणूक येतात आणि जातात; मात्र गावातील नाती, मैत्री आणि भावकी टिकली पाहिजे. त्यामुळे सामाजिक सलोखा जपत कारखान्याच्या दीर्घकालीन हिताचा निर्णय घ्यावा, असे त्या म्हणाल्या.
‘कपबशी’ चिन्हावर पॅनल टू पॅनल मतदानाचे आवाहन
अजितदादांवरील प्रेम आणि त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता कृतीतून व्यक्त करण्याची संधी सभासदांना मिळाली आहे, असे सांगत सुनेत्रावहिनींनी आपल्या भाषणाच्या शेवटी निवडणुकीतील स्पष्ट भूमिका मांडली.
अजितदादांचा विकासवारसा पुढे नेण्यासाठी, त्यांनी पाहिलेली अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि सोमेश्वर कारखान्याच्या प्रगतीला गती देण्यासाठी ‘अजितदादा विकासपुरुष पॅनल’ला कपबशी या चिन्हावर पॅनल टू पॅनल मतदान करून बहुमताने विजयी करावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
अजितदादांच्या आठवणी, शेतकऱ्यांच्या अपेक्षा, कारखान्याच्या भवितव्याची चिंता आणि विकासाचा मुद्दा या सर्वांचा संगम सुनेत्रावहिनींच्या आवाहनातून दिसून आला. आता सभासद या आवाहनाला मतदानातून कसा प्रतिसाद देतात, याकडे सोमेश्वरच्या निवडणुकीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






