बारामतीकरांचा सवाल—अजितदादांच्या अपघाताचे सत्य कधी समोर येणार? जय पवारांची CID अधिकाऱ्यांशी भेट!

बारामतीकरांचा सवाल—अजितदादांच्या अपघाताचे सत्य कधी समोर येणार? जय पवारांची CID अधिकाऱ्यांशी भेट!
तपासाची सद्यस्थिती, प्रलंबित बाबी आणि संभाव्य कालावधीबाबत विचारणा; अपघाताचे सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार
पुणे :प्रतिनिधि
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाला गती देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पुण्यातील कार्यालयात संबंधित CID अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. या प्रकरणातील प्रलंबित बाबींची चौकशी करून तपास पारदर्शकपणे आणि विनाविलंब पूर्ण करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
या भेटीदरम्यान जय पवार यांनी तपासात आतापर्यंत झालेली कार्यवाही, सध्या सुरू असलेली प्रक्रिया, तपास पूर्ण होण्यासाठी लागणारा संभाव्य कालावधी तसेच अद्याप प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या बाबींबाबत अधिकाऱ्यांकडे सविस्तर विचारणा केली. विमान अपघाताच्या तपासात प्रत्येक महत्त्वाच्या बाबीचा सखोल विचार व्हावा आणि तपासात कोणतीही दिरंगाई होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘अजितदादांच्या अपघाताचे सत्य समोर येणे आवश्यक’
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न असून, त्यांची उत्तरे मिळणे आवश्यक असल्याचे जय अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाकडे केवळ एका कुटुंबाचा प्रश्न म्हणून न पाहता, अजितदादांवर प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या विश्वासाशी संबंधित विषय म्हणून पाहिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
तपासातील प्रत्येक महत्त्वाच्या बाबीची गांभीर्याने चौकशी व्हावी, उपलब्ध माहिती आणि पुराव्यांच्या आधारे सत्य जनतेसमोर यावे, तसेच तपासाची प्रक्रिया पारदर्शक असावी, अशी अपेक्षा त्यांनी अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.
तपासातील प्रलंबित बाबींवर लक्ष
विमान अपघाताच्या तपासाला अधिक गती देताना कोणत्या बाबी अद्याप प्रलंबित आहेत, तपास पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो आणि पुढील कार्यवाही काय असेल, याबाबत जय पवार यांनी विचारणा केली. अपघाताशी संबंधित सर्व बाबींचा सखोल तपास करून, चौकशीतून दोष निश्चित झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार’
अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर येईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचा ठाम निर्धार जय अजितदादा पवार यांनी व्यक्त केला. या भेटीवेळी आमदार विक्रम काकडे उपस्थित होते.
या भेटीमुळे अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून, तपासाची पुढील दिशा आणि प्रलंबित प्रश्नांबाबत अधिकृत स्तरावर काय माहिती समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






