राजकीय

तो मफलर मॅन नेमका कोण? अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचा पुन्हा मोठा गौप्यस्फोट!

साडेनऊ महिने झाले, तरी सत्य गुलदस्त्यात!

तो मफलर मॅन नेमका कोण? अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचा पुन्हा मोठा गौप्यस्फोट!

साडेनऊ महिने झाले, तरी सत्य गुलदस्त्यात!

मुंबई; प्रतिनिधि

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ अद्याप कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत पत्रकार परिषदेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजितदादांचा अपघात नेमका कसा झाला? हा केवळ अपघात होता की त्यामागे घातपाताची शक्यता आहे? तपासातून अद्याप ठोस माहिती समोर का आली नाही? असे सवाल उपस्थित करत त्यांनी तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

या पत्रकार परिषदेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे ‘मफलर मॅन’! रोहित पवार यांनी यापूर्वीही या व्यक्तीचा उल्लेख केला होता. मात्र, या पत्रकार परिषदेतही त्यांनी मफलर मॅनची नेमकी ओळख जाहीर केली नाही. त्यामुळे हा मफलर मॅन नेमका कोण? त्याचा अजितदादांच्या अपघाताशी काय संबंध आहे? त्याच्याकडे कोणती माहिती आहे? असे अनेक प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत.

अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक साद!

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला रोहित पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. दादांच्या अपघातामागील सत्य अद्याप समोर आलेले नाही. ते सत्य समजावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. दादांचे विविध व्हिडिओ दाखवत त्यांच्या कामाची पद्धत, मिश्किल स्वभाव आणि राज्याच्या हितासाठी घेतलेले निर्णय यांची आठवण त्यांनी करून दिली. दादांसारख्या नेत्याच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

माहिती देणारे लोक समोर येण्यास तयार?

रोहित पवार यांनी या प्रकरणात काही प्रामाणिक व्यक्तींकडून माहिती मिळत असल्याचा दावा केला. माहिती देणाऱ्या व्यक्तींनाही आपली ओळख उघड होण्याची आणि कारवाई होण्याची भीती असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, संबंधित व्यक्तींनी आपल्यावर कारवाई झाली तरी चालेल, अशी भूमिका घेतल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले.

त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणते पुरावे किंवा माहिती समोर येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सीबीआय तपास कुठे अडकला? सत्ताधाऱ्यांनाच सवाल!

अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासाला साडेनऊ महिने उलटूनही ठोस माहिती समोर आलेली नसल्याचा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला. सीआयडीकडे तपास देण्यामागे घातपाताची शक्यता तपासणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, सीबीआयकडे तपास देण्याची मागणी आपण केली नव्हती, तर अजित पवार गटातील आमदारांनीच ती मागणी केली होती. सत्ताधाऱ्यांकडून विनंती करूनही तपास सीबीआयकडे का गेला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मफलर मॅनचे गूढ कायम!

या संपूर्ण प्रकरणात मफलर मॅनची ओळख हा सर्वाधिक उत्सुकतेचा विषय बनला आहे. रोहित पवार यांनी त्याचे नाव जाहीर न केल्याने या व्यक्तीबाबतचे गूढ आणखी वाढले आहे. मात्र, केवळ उल्लेखावरून या व्यक्तीचा अपघाताशी संबंध असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. त्याबाबत अधिकृत माहिती किंवा तपास यंत्रणांकडून पुष्टी होणे महत्त्वाचे आहे.

एकीकडे अजितदादांच्या अपघाताचा तपास, दुसरीकडे मफलर मॅनचे गूढ आणि तिसरीकडे सीबीआय तपासाचा प्रश्न… रोहित पवारांच्या या पत्रकार परिषदेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे वादळ निर्माण झाले आहे. आता या प्रश्नांवर तपास यंत्रणा काय उत्तर देणार आणि मफलर मॅनची ओळख कधी समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button