दोन लाखांची खंडणी मागितली, नकार देताच गोळ्या झाडल्या! बारामतीत गुन्हेगारांचा बेधडक थरार; तीन हल्लेखोर CCTV मध्ये कैद!
इन्स्टाग्रामवरून फोन, थेट दोन लाखांची मागणी!

दोन लाखांची खंडणी मागितली, नकार देताच गोळ्या झाडल्या! बारामतीत गुन्हेगारांचा बेधडक थरार; तीन हल्लेखोर CCTV मध्ये कैद!
इन्स्टाग्रामवरून फोन, थेट दोन लाखांची मागणी!
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडवली असून, खंडणीची मागणी केल्यानंतर थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) सायंकाळी बारामतीत घडली. सूर्यनगरी परिसरातील महादेव मंदिराजवळ राहणारे बांधकाम व्यावसायिक राजन धनंजय कोळेकर यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इन्स्टाग्रामवरून फोन, थेट दोन लाखांची मागणी!
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ४ वाजून १८ मिनिटांनी राजन कोळेकर यांना ‘BK Group’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण ‘BK’ बोलत असल्याचे सांगत, “तुम्ही सगळ्यांना पैसे देता, मला दोन पेटी (दोन लाख रुपये) द्या,” अशी मागणी केली. मात्र, कोळेकर यांनी कोणालाही पैसे दिले नसल्याचे सांगत पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर समोरच्या व्यक्तीने फोन कट केला.
खंडणीला नकार अन् काही वेळातच घराबाहेर गोळीबार!
या फोननंतर अवघ्या काही वेळातच, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोळेकर यांच्या घराबाहेर मोटारसायकल जोरात रेस करण्याचा आवाज आला. नेमके कोण आले आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक प्रकार समोर आला. एका मोटारसायकलवरून तीन अज्ञात इसम आले होते. त्यापैकी एकाने घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कोळेकर यांच्या चारचाकी वाहनावर गोळीबार केला आणि तिघेही घटनास्थळावरून पसार झाले.
गाडीवर गोळीचे निशाण, घटनास्थळी काडतूसही आढळले!
घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पाहणीत वाहनाच्या मागील बाजूच्या पत्र्यावर गोळी लागल्याचे निशाण दिसून आले. घटनास्थळी गोळीचा पुढील भाग आणि एक रिकामे काडतूसही आढळून आले. विशेष म्हणजे, गोळीबार झाला त्यावेळी वाहनात किंवा पार्किंग परिसरात कोळेकर यांच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना!
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बारामती तालुका पोलीस ठाण्याची दोन पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अशा तीन पथकांना संशयितांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) पथकाला पाचारण करण्यात आले असून, पंचनामा व तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार तसेच बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
खंडणीसाठी धमकी, नकारानंतर गोळीबार; बारामतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
दोन लाख रुपयांची मागणी, त्यानंतर काही वेळातच घराबाहेर येऊन वाहनावर गोळीबार आणि सीसीटीव्हीत कैद झालेले तीन हल्लेखोर, या घटनाक्रमामुळे बारामतीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. हा गोळीबार खंडणीच्या मागणीशी संबंधित आहे का, हल्लेखोर कोणाच्या सांगण्यावरून आले होते आणि या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
भरवस्तीत घराजवळ येऊन गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जात असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय? खंडणीखोरांना नेमका कोणाचा धाक उरला आहे? सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या हल्लेखोरांना पोलीस कधी जेरबंद करणार, याकडे आता बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.






