बारामती–मोरगाव रोडवर मृत्यूचा खेळ! धडकेने तरुणाचा हात १०० फूट दूर; अल्टोतील व्यक्तींचा पळ!
जखमीला सोडून चालक फरार!

बारामती–मोरगाव रोडवर मृत्यूचा खेळ! धडकेने तरुणाचा हात १०० फूट दूर; अल्टोतील व्यक्तींचा पळ!
जखमीला सोडून चालक फरार!
बारामती वार्तापत्र
बारामती–मोरगाव रस्त्यावर मेडद गावानजीक काल रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. मारुती सुझुकी अल्टो आणि होंडा युनिकॉर्न दुचाकी यांच्यात झालेली धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात दुचाकीस्वाराचा एक हात शरीरापासून वेगळा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मेडद गावाजवळील जानाई पेट्रोल पंप परिसरात मारुती सुझुकी अल्टो (क्रमांक MH14 DA 2922) या चारचाकी वाहनाने होंडा युनिकॉर्न (क्रमांक MH42 AY 7532) या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, दुचाकीस्वाराचा हात तुटून अपघातस्थळापासून सुमारे १०० फूट अंतरावर चारचाकी वाहनाजवळ पडल्याचे आढळून आले.
या अपघातात जळगाव सुपे येथील तानाजी वामन खंडागळे (वय अंदाजे २५ वर्षे) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर चारचाकीतील व्यक्ती फरार?
या घटनेतील सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे अपघातानंतर चारचाकीतील व्यक्तींनी जखमी तरुणाला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित वाहनात एक पुरुष आणि एक महिला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी महिलेची चप्पल आढळल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.
नागरिकांच्या तत्परतेमुळे जखमीला मिळाली मदत!
अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी १०८ रुग्णवाहिका सेवा आणि ११२ आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.
जखमी तरुणाला रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले, त्यावेळी त्याचा श्वास सुरू असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आले.
फरार चालकाचा शोध घेण्याचे आव्हान!
या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चारचाकी वाहनातील व्यक्ती नेमक्या कोण होत्या, अपघात कसा घडला आणि चालक घटनास्थळावरून का फरार झाला, याचा तपास होणे आवश्यक आहे. पोलिसांकडून या घटनेची पुढील चौकशी सुरू असून संबंधित वाहन आणि चालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
जखमी तानाजी खंडागळे यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. पुढील वैद्यकीय माहिती आणि पोलिस तपासातील घडामोडी समोर आल्यानंतर अधिक तपशील स्पष्ट होणार आहेत.






