बारामतीत गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट उघड! ५ पिस्टल अन् ५ काडतुसे जप्त; पाच आरोपींना अटक!
प्रदेशातील शिरपूर कनेक्शन उघड

बारामतीत गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट उघड! ५ पिस्टल अन् ५ काडतुसे जप्त; पाच आरोपींना अटक!
प्रदेशातील शिरपूर कनेक्शन उघड
बारामती वार्तापत्र
बारामती शहर आणि परिसरात गावठी पिस्तुलांच्या जोरावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात बारामती शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम उघडत तब्बल ५ गावठी पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसे जप्त केली असून, पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे बारामतीतील अवैध शस्त्रांच्या व्यवहाराचे धागेदोरे समोर आले असून, पिस्तुले मध्य प्रदेशातील शिरपूर येथून आणली जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी मनीषा ओमासे यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहर पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले.
टी.सी. कॉलेज परिसरात पहिला सापळा; शिरपूरपर्यंत पोहोचले पोलिसांचे धागेदोरे!
२२ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी टी.सी. कॉलेज परिसरात सापळा रचून आदित्य चंद्रकांत शेलार (रा. आमराई, बारामती) याला स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले. त्याच्या कारची झडती घेतली असता एक गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली.
तपासादरम्यान हे पिस्टल मयूर विष्णू मोरे (रा. मेडद, बारामती) याने दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मयूर मोरेला अटक केली. त्याने हे शस्त्र शिरपूर (जि. धुळे) येथून आणल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक थेट शिरपूर येथे पोहोचले. २३ नोव्हेंबर रोजी रात्री शांतीराम पावरा याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे आणखी दोन गावठी पिस्टल आढळून आली. या कारवाईत एकूण तीन पिस्टल जप्त करण्यात आल्या.
शिवाजी चौकात दुसरी कारवाई; एक पिस्टल जप्त!
२४ नोव्हेंबर रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवाजी चौक परिसरात कारवाई करण्यात आली. यावेळी धीरज रवींद्र पडकर (रा. आमराई, बारामती) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
नीरा रोडवर तिसरा दणका; आणखी एक पिस्टल हस्तगत!
२६ नोव्हेंबर रोजी नीरा रोड परिसरात पोलिसांनी तिसरी कारवाई केली. यामध्ये मंगेश सुभाष मदने (रा. भीमरत्ननगर, कसबा, बारामती) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले.
अवैध शस्त्रधारकांनो सावधान; पोलिसांचा इशारा!
बारामती शहरात अवैध शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. परिसरात कुठेही अवैध शस्त्रे किंवा अवैध धंदे सुरू असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रभारी अधिकारी मनीषा ओमासे यांनी केले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी मनीषा ओमासे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, रामचंद्र शिंदे, पवार, झणझणे, कांबळे तसेच पोलीस शिपाई विजय ओमासे, प्रवीण शिंगाडे आणि अक्षय शिताप यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
एकंदरीत, बारामती शहर पोलिसांनी केलेल्या या सलग कारवायांमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, या शस्त्रांचा पुरवठा नेमका कोणामार्फत होत होता, यामागे आणखी कोणाचे जाळे आहे का आणि या प्रकरणातील इतर संभाव्य दुवे कोणते, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.






