बारामतीत तोतया IPS चा पर्दाफाश! ७ लाख ८५ हजारांचा गंडा; सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक!
मंत्रालयात मोठ्या ओळखी असल्याची मारली थाप; अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरी लावण्याचे आमिष!

बारामतीत तोतया IPS चा पर्दाफाश! ७ लाख ८५ हजारांचा गंडा; सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक!
मंत्रालयात मोठ्या ओळखी असल्याची मारली थाप; अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरी लावण्याचे आमिष!
बारामती वार्तापत्र
स्वतःला आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून सरकारी नोकरीचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल ७ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. मंत्रालयात मोठ्या ओळखी असल्याची बतावणी करून नोकरी लावून देण्याचे आश्वासन देणाऱ्या तोसीन इब्राहीम मनियार (रा. सय्यद पाटकर वस्ती, बारामती) याला बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे.
डोर्लेवाडी येथील आरीफ शहाजहान शेख आणि त्याच्या भावाला आरोपीने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले होते. मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असून अन्न व औषध प्रशासन विभागात सरकारी नोकरी लावून देऊ, असे आश्वासन त्याने दिले. सरकारी नोकरीच्या अपेक्षेने शेख यांनी आरोपीवर विश्वास ठेवला.
याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ८५ हजार रुपये उकळले. एवढ्यावरच न थांबता नोकरी मिळाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी बनावट नियुक्तीपत्र आणि नोकरीसाठी आवश्यक प्रमाणपत्रेही तयार करून दिली. सन २०२२ ते २०२६ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीतून समोर आले आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरीफ शेख यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र, आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे त्याचा माग काढत त्याला अटक केली.
या प्रकरणामुळे सरकारी नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ मोठ्या ओळखी आणि अधिकारी असल्याच्या दाव्यावर विश्वास ठेवून पैसे देणाऱ्या तरुणांनी सावध राहण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
पोलीस पथका
पोलीस पथकाची कामगिरी
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी मनीषा ओमासे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री देवकाते, पोलीस शिपाई विजय ओमासे आणि प्रवीण शिंगाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.






