आपला जिल्हा

इंदापुरातच फिजिओथेरपीचे शिक्षण; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी संधी!

विठ्ठलराव भरणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या पहिल्या बॅचचे उत्साहात स्वागत; श्रीराज भरणे यांची उपस्थिती..

इंदापुरातच फिजिओथेरपीचे शिक्षण; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी संधी!

विठ्ठलराव भरणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या पहिल्या बॅचचे उत्साहात स्वागत; श्रीराज भरणे यांची उपस्थिती..

इंदापूर –

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, त्यांना स्थानिक पातळीवरच व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने इंदापुरात सुरू झालेल्या विठ्ठलराव भरणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या पहिल्या शैक्षणिक बॅचचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या महाविद्यालयामुळे इंदापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी फिजिओथेरपी क्षेत्रातील शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे. यापूर्वी या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांची वाट धरावी लागत होती. आता हे शिक्षण इंदापुरातच उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ, खर्च आणि शहरात राहण्याचा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होणार आहे.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीराज भरणे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, जिद्द आणि कष्ट करण्याची क्षमता आहे. त्यांना केवळ योग्य शैक्षणिक सुविधा आणि संधी मिळण्याची गरज आहे. इंदापुरात फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू होणे ही परिसरासाठी अभिमानाची बाब असून विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे. आधुनिक वैद्यकीय ज्ञान आत्मसात करून कुशल आणि सक्षम फिजिओथेरपिस्ट म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी.

फिजिओथेरपी हे केवळ पदवी मिळविण्याचे क्षेत्र नसून रुग्णांना पुन्हा स्वावलंबी आणि सक्षम बनविण्याचे महत्त्वपूर्ण सेवाकार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच रुग्णांप्रती संवेदनशीलता, सेवाभाव आणि व्यावसायिक प्रामाणिकपणा जोपासावा. या महाविद्यालयातून भविष्यात दर्जेदार फिजिओथेरपिस्ट घडतील आणि परिसरातील आरोग्यसेवेला निश्चितच हातभार लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या स्वागत समारंभास मधुकरमामा भरणे, शोभामामी भरणे, अक्षय भैय्या भरणे, प्रितेशभाऊ भरणे, डॉ. धापटे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. पहिल्या बॅचच्या स्वागताने विठ्ठलराव भरणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या शैक्षणिक प्रवासाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली.

Back to top button