खेळाच्या मैदानातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला बळ; शहा ग्लोबल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
दोन दिवस रंगल्या विविध क्रीडा स्पर्धा; विजेत्या विद्यार्थ्यांना पदके, प्रमाणपत्रे अन् चषक देऊन गौरव

खेळाच्या मैदानातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला बळ; शहा ग्लोबल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
दोन दिवस रंगल्या विविध क्रीडा स्पर्धा; विजेत्या विद्यार्थ्यांना पदके, प्रमाणपत्रे अन् चषक देऊन गौरव
इंदापूर :
शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर खेळाच्या मैदानावर मिळणारी शिस्त, संघभावना, जिद्द आणि पराभवातून पुन्हा उभे राहण्याची ताकदही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी तितकीच महत्त्वाची असते. याच विचाराला केंद्रस्थानी ठेवून शहा ग्लोबल स्कूल, इंदापूर येथे आयोजित दोन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६-२७ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या क्रीडागुणांचे दर्शन घडविले. विजेत्या विद्यार्थ्यांचा पदके, प्रमाणपत्रे आणि चषक देऊन गौरव करण्यात आला.

क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेले धावपटू दीपक मकरंद गावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. अभिजित जी. ठोंबरे आणि आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ज्ञ डॉ. अश्विनी ठोंबरे यांची सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या वैष्णवी देशपांडे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच कला, क्रीडा, संस्कार आणि जीवनकौशल्यांच्या विकासाला शाळा प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. अभिजित ठोंबरे यांनी ‘हेल्थ इज वेल्थ’ या विषयातून नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. डॉ. अश्विनी ठोंबरे यांनी डिजिटल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. मुलांना वेळ देणे, त्यांच्या आवडी-निवडी समजून घेणे आणि योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे दीपक गावडे यांनी आपल्या क्रीडा प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. खेळ आणि शिक्षण यांची तुलना न करता दोन्ही गोष्टींना समान महत्त्व देण्याचा संदेश त्यांनी दिला. खेळामुळे जीवनाला दिशा मिळते, तसेच अनेक जीवनमूल्ये आत्मसात करण्याची संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात सातत्याने मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

शाळेचे व्यवस्थापन सदस्य अंगद शहा यांनी विजयाइतकेच पराभवाचेही महत्त्व असल्याचे सांगितले. विजय आनंद देतो, तर पराभव नवी शिकवण देतो. त्यामुळे अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न करत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
पहिल्या दिवशी प्री-प्रायमरी आणि प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांसाठी ५० व ८० मीटर अडथळा शर्यत, १०० मीटर धावणे, मनोरंजक खेळ, सांघिक खेळ, खो-खो आणि रिले रेस अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पालकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी चपळता, जिद्द आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले.

दुसऱ्या दिवशी प्रमोद शहा, सारिका शहा आणि प्रियांका शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा स्पर्धांचा उत्साह कायम राहिला. विविध वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण कामगिरी केली. स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व पदके, तर विजेत्या सांघिक संघांना प्रमाणपत्रे आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी व्यवस्थापन सदस्य मुकुंद शहा, अंकिता शहा, इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा, अंगद शहा आणि रुचिरा शहा उपस्थित होते. दोन दिवसीय महोत्सवाच्या यशस्वी नियोजनासाठी शाळेचे क्रीडा विभागप्रमुख संकेत माने यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा बुरले यांनी केले, तर अमृता चव्हाण यांनी आभार मानले.

विजयापेक्षा जिद्द आणि खेळाडूवृत्ती महत्त्वाची!
“मैदानावर जिंकलेली पदके ही विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची ओळख असली, तरी विजय स्वीकारताना दाखवलेली नम्रता आणि पराभवातून पुन्हा उभे राहताना दाखवलेली जिद्द हीच खरी कमाई असते. शहा ग्लोबल स्कूलच्या क्रीडा महोत्सवातून विद्यार्थ्यांना शिस्त, चिकाटी, नेतृत्व आणि संघभावनेचे महत्त्व अनुभवता आले. खेळाचा आनंद घेत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा हा महोत्सव त्यांच्या सर्वांगीण जडणघडणीतील महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.”
– भरत शहा, नगराध्यक्ष, इंदापूर






