FDA च्या कारवाईच्या भीतीने कऱ्हा नदीत चहा पावडर फेकल्याची चर्चा?; पालखी मुक्कामापूर्वी बारामतीत खळबळ
प्रकरणी संबंधित विभागाकडून चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार

FDA च्या कारवाईच्या भीतीने कऱ्हा नदीत चहा पावडर फेकल्याची चर्चा?; पालखी मुक्कामापूर्वी बारामतीत खळबळ
प्रकरणी संबंधित विभागाकडून चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार
बारामती वार्तापत्र
संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे उद्या बारामतीत आगमन होणार असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. अशातच मळद येथील कऱ्हा नदीत पोत्यांमधील चहा पावडर फेकण्यात आल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीतील एका व्यापाऱ्याने किंवा दुकानदाराने पोतभर चहा पावडर कऱ्हा नदीत टाकल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच काही नागरिकांनी संबंधित व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीनेच ही चहा पावडर नदीत फेकण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी झालेली नाही. संबंधित चहा पावडर निकृष्ट दर्जाची होती का, कालबाह्य झाली होती का किंवा इतर कोणते कारण होते, याबाबतही अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी FDA कडून विविध ठिकाणी तपासणी मोहीम सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणी संबंधित विभागाकडून चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत FDA च्या कारवाईच्या भीतीने चहा पावडर नदीत फेकल्याची चर्चा असली, तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.






