‘हरित वारी-सुरक्षित वारी’चा संकल्प; इंदापूरमध्ये वारकरी सेवेसाठी विशेष नियोजन
वारकरी सेवेसाठी इंदापूर सज्ज..

‘हरित वारी-सुरक्षित वारी’चा संकल्प; इंदापूरमध्ये वारकरी सेवेसाठी विशेष नियोजन
वारकरी सेवेसाठी इंदापूर सज्ज..
इंदापूर, आदित्य बोराटे –
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी इंदापूर शहर सज्ज झाले असून वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सर्व सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणापासून पालखी मार्गापर्यंत आवश्यक सुविधा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून संपूर्ण यंत्रणा सेवेसाठी सज्ज असल्याची माहिती नगराध्यक्ष भरत शहा तसेच मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथील पालखी तळावर वारकऱ्यांसाठी मंडप, निवारा, व्यासपीठ, वीज, स्वतंत्र स्नानगृहे, शौचालये आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. नगरपरिषदेचे १०४ अधिकारी व कर्मचारी पालखी व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे, रिंगणस्थळाची तयारी, पालखी तळाचे सुशोभीकरण, शहर स्वच्छता, धूर फवारणी, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, तसेच पथदिवे आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून सहा ठिकाणी टँकर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

‘निर्मल वारी’ उपक्रमांतर्गत शहरातील २० ठिकाणी तात्पुरती शौचालये उभारण्यात येणार असून नगरपरिषदेची १३ सार्वजनिक शौचालयेही वारकऱ्यांसाठी खुली ठेवण्यात येणार आहेत. पालखी तळावर २४ तास कार्यरत आपत्कालीन नियंत्रण कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदा ‘हरित वारी – सुरक्षित वारी’ या संकल्पनेनुसार पालखी मार्गावर वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त आणि तंबाखूमुक्त वातावरण राखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले. तर मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी पालखी सोहळा शांततेत, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात पार पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.






