
इंदापूरात 1000 किलो मांस जप्त;साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत
इंदापुरात गाईंची सुटका
इंदापूर; प्रतिनिधी
इंदापूर शहरालगत राजवडी पाटी येथे जिवंत जर्सी गाईंच्या वासरांसह परवाना नसताना 1000 किलो जनावरांचे कत्तल केलेले मांस घेऊन जाणाऱ्या पाच जणांविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 7 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
फरीद मोहमंद शेख (वय 27, रा. सरस्वतीनगर, ता. इंदापूर), वासीम मणेर कुरेशी (वय 27, रा. कुरेशीगल्ली, इंदापूर), रेहान बशिर कुरेशी (वय 24, रा. कासारपट्टा, इंदापूर), सलीम रज्जाक बेपारी(वय 36) व मुस्तफा शकिल कुरेशी (वय 24, दोघे रा. श्रीरामचौक, इंदापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस शिपाई गणेश मछिंद्र डेरे यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि.25) फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास आरोपी परवाना नसताना जनावरांची कत्तल करून वाहनातून गोमांस घेऊन जात होते. तसेच, जनावरांच्या चारापाण्याची सोय न करता त्यांना वाहनात दाटीवाटीने कोंबून घेऊन जात होते. यावेळी इंदापूर पोलिसांनीवाहन अडवून तपासणी केल्यावर हा प्रकार उघडकीला आला. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन लाख रुपये किमतीचे जनावरांचे मांस, पाच हजार रुपये किमतीची पाच जर्सी वासरे, दोन चारचाकी वाहने (क्रमांक MH 12 JF 7304 व MH 45 E 7903) असा 7 लाख 55 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश माने तपास करत आहेत.