राजकीय

एकनाथ खडसे राष्ट्रवादीतच जाणार; मुहूर्ताबरोबर फॉर्म्युलाही ठरल्याची चर्चा

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांचा पक्षांतराचा निर्णय पक्का झाला असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधतील अशी जोरदार चर्चा आहे.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीतच जाणार; मुहूर्ताबरोबर फॉर्म्युलाही ठरल्याची चर्चा

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांचा पक्षांतराचा निर्णय पक्का झाला असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधतील अशी जोरदार चर्चा आहे.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजीमंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीकडून महत्वाचे संघटनात्मक पद घ्यावे, त्यानंतर विधानपरिषदेवर आमदार होऊन थेट मंत्री व्हावे, अशा स्वरुपाचा राजकीय फॉर्म्युला खडसे यांच्या प्रवेशासाठी ठरला असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपकडून सातत्याने अन्याय होत असल्याने एकनाथ खडसे हे पक्षांतराच्या निर्णयापर्यंत आले आहेत. टोकाची भूमिका घेऊनही भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी खडसेंच्या बाबतीत ठोस भूमिका न घेता त्यांना बेदखल केले. यामुळे खडसे प्रचंड नाराज आहेत. मध्यंतरी त्यांनी आपली राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रत्यक्ष हात असल्याचा घणाघाती आरोप केला होता. नंतर फडणवीसांवर ते सातत्याने टीकास्त्र डागत आहेत. कालच फडणवीस हे गिरीश महाजन यांच्या ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जळगावात आलेले होते. परंतु, खडसेंनी या सोहळ्याचे निमंत्रण असतानाही फडणवीसांची भेट टाळली. त्यामुळे आता खडसे लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

खडसेंसोबत अनेक जण राष्ट्रवादीत जाणार

खडसेंसोबत भाजपच नाही तर इतर पक्षातील नेतेमंडळी जाऊ शकते, अशी माहिती आहे. खडसेंच्या मुंबई वारीनंतर राष्ट्रवादी प्रवेशाच्या अनुषंगाने गुप्त बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यात पक्षांतराच्या बाबतीत चाचपणी सुरू आहे. खडसेंसोबत जायचे की नाही? हे एकदाचे ठरले की मग याच आठवड्यात ‘घटस्थापने’च्या मुहूर्तावर मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांचा राष्ट्रवादी प्रवेश सोहळा होणार असल्याचे निश्चित झाले आहे. खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर मात्र, खान्देशातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलणार आहे

वजनदार खात्याची प्रतीक्षा

राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना वजनदार खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. तूर्तास पक्षाकडून महत्वाचे संघटनात्मक पद घ्यायचे. त्यानंतर विधानपरिषद मार्गे मंत्री व्हायचे, अशा पद्धतीने खडसेंच्या राजकीय पुनर्वसनाची दिशा ठरली आहे. खडसेंना राजकीय अनुभव व अभ्यास पाहता त्यांना कृषी मंत्रिपद मिळू शकते, असा विश्वासही खडसे समर्थकांना आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!