दर वाढले, पण फायदा शेतकऱ्यांना होणार का?; साखर आयातीवरून राजू शेट्टी बारामती आक्रमक
गोदामांची प्रत्यक्ष तपासणी करा.

दर वाढले, पण फायदा शेतकऱ्यांना होणार का?; साखर आयातीवरून राजू शेट्टी बारामती आक्रमक
गोदामांची प्रत्यक्ष तपासणी करा.
बारामती वार्तापत्र
साखरेच्या दरात वाढ होत असताना त्याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला असता तर आनंद झाला असता. मात्र, साखरेच्या उपलब्ध साठ्याबाबत सरकारच्या आकडेवारीत विसंगती असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.
साखरेच्या वाढलेल्या दरांमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी देशातील साखर कारखाने आणि गोदामांची प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
साखरेच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या साखर धोरणावर प्रश्न उपस्थित केले. दर महिन्याला देशांतर्गत बाजारासाठी सुमारे २२ लाख टन साखरेचा कोटा उपलब्ध करून दिला जात असताना, सरकारच्या आकडेवारीनुसार ४५ ते ४८ लाख टन साखरेच्या साठ्याचा हिशेब स्पष्ट होत नसल्याचा दावा त्यांनी केला.
साखर आयातीच्या निर्णयावर सवाल
केंद्र सरकारने १० लाख टन साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे. ऑक्टोबरमध्ये आयात केलेली साखर देशात येण्याची शक्यता असून, त्याच काळात नवीन गाळप हंगाम सुरू होणार आहे.
त्यामुळे बाजारात साखरेचा पुरवठा वाढल्यास दर घसरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या दरवाढीचा खरा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार का, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.
साखरेचा साठा रोखून ठेवून दर वाढल्यानंतर बाजारात साखर आणली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही कारखान्यांनी साखर विक्रीसाठी निविदा काढल्या; मात्र प्रत्यक्ष विक्री झाली नसल्याचे सांगत या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
साखर गोदामांची प्रत्यक्ष तपासणी करा
देशात साखरेची कमतरता भासण्याची परिस्थिती सरकारी आकडेवारीवरून दिसत नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
त्यामुळे केवळ कागदोपत्री आकडेवारीवर विश्वास न ठेवता साखर कारखाने आणि गोदामांमध्ये प्रत्यक्ष किती साठा आहे, याची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच साखर निर्यातीवर निर्बंध असताना चोरट्या मार्गाने साखर बांगलादेश किंवा पाकिस्तानमध्ये गेली आहे का, याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली. साखरेच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असेही शेट्टी म्हणाले.
‘इथेनॉलमुळे साखरेचा तुटवडा नाही’
इथेनॉल निर्मितीकडे साखर वळवल्यामुळे देशात साखरेचा तुटवडा निर्माण झाल्याचे म्हणणे योग्य नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या धोरणानुसार साखर उद्योगाने इथेनॉल निर्मितीसाठी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या धोरणातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पुढील वर्षी देशात सुमारे ३०० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करत साखरेची उपलब्धता आणि बाजारातील दर यासाठी सरकारने दीर्घकालीन नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.
एफआरपीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत मिळण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने ठोस भूमिका घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.






