बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्यात पेंटवॉश प्रकरणाचा ‘हिशेब’ कोण देणार?; निलंबन, राजीनामा अन् चौकशीचे प्रश्न
बिलातून पैशांची मागणी?

बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्यात पेंटवॉश प्रकरणाचा ‘हिशेब’ कोण देणार?; निलंबन, राजीनामा अन् चौकशीचे प्रश्न
बिलातून पैशांची मागणी?
बारामती वार्तापत्र
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात पेंटवॉश वाहतुकीच्या ठेकेदाराच्या बिलाच्या प्रक्रियेवरून खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात ठेकेदाराच्या बिलाशी संबंधित प्रक्रियेत पैशांची मागणी केल्याचा आरोप समोर आल्यानंतर लिपिक नाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तर या प्रकरणाशी संबंधित असलेल्या जगदाळे यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
कारखान्यातील पेंटवॉश शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जात असल्याचे सांगितले जाते. तसेच त्याची वाहतूकही केली जाते. मात्र, कारखान्यातून नेमका किती पेंटवॉश बाहेर गेला, शेतकऱ्यांना किती वितरित करण्यात आला आणि सध्या किती साठा उपलब्ध आहे, याबाबतच्या नोंदी व प्रत्यक्ष साठा यांचा ताळमेळ तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
ठेकेदार आटोळे यांच्या पेंटवॉश वाहतूक बिलाची प्रक्रिया अकाउंट विभागामार्फत संचालक मंडळासमोर आली होती. याच प्रक्रियेदरम्यान पैशांची मागणी झाल्याचा आरोप समोर आल्याने नाळे यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर संबंधित विभागातील जबाबदाऱ्या आणि बिलाची प्रक्रिया नेमकी कोणकोणत्या टप्प्यांतून झाली, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पेंटवॉशचा साठा सील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कारखान्याच्या संचालक मंडळासह व्यवस्थापकीय संचालकांनी १५ ऑगस्टपूर्वी पेंटवॉशच्या संबंधित साठ्याची पाहणी करून तो सील केल्याची माहिती आहे. साठ्याची प्रत्यक्ष मोजणी, उपलब्ध नोंदी तसेच वाहतुकीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
मात्र, पेंटवॉशच्या खरेदीपासून वितरण आणि वाहतुकीपर्यंतच्या संपूर्ण व्यवहाराचा ताळमेळ स्पष्ट होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्यक्ष साठा आणि कागदोपत्री नोंदी यामध्ये काही तफावत आढळते का, याकडे शेतकरी आणि कारखान्याचे सभासदांचे लक्ष लागले आहे.
बिल प्रकरणातून प्रश्नांची व्याप्ती वाढली
या प्रकरणात केवळ एका कर्मचाऱ्यावर झालेली कारवाई पुरेशी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बिल कोणाच्या शिफारशीने पुढे गेले, त्याची तपासणी कोणत्या अधिकाऱ्यांनी केली, वाहतूक किती झाली आणि त्याची नोंद कशी ठेवण्यात आली, याची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ठेकेदार आटोळे हे कारखान्यातील एका व्यवस्थापकासोबत व्यावसायिक भागीदारीत असल्याची चर्चा कारखाना परिसरात सुरू आहे.
मात्र, या चर्चेबाबत अधिकृतपणे कोणतीही पुष्टी झालेली नाही.उपमुख्यमंत्र्यांसमोरही विषय मांडल्याची माहिती या प्रकरणाची चौकशी उपमुख्यमंत्र्यांसमोर झाल्याचे काही संचालकांनी सांगितल्याची माहिती आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासमोरही हा विषय मांडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती कारखान्याच्या अंतर्गत चौकशीपलीकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांसाठीच्या पेंटवॉशचा हिशेब महत्त्वाचा
शेतकऱ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पेंटवॉशच्या प्रत्येक आवक-जावकेची आणि वितरणाची नोंद व्यवस्थित असणे अपेक्षित आहे. किती माल खरेदी करण्यात आला, किती वितरित झाला, किती वाहतूक करण्यात आली आणि किती साठा शिल्लक आहे, याचा स्पष्ट ताळमेळ तपासणे आवश्यक आहे.
नाळे यांचे निलंबन, जगदाळे यांचा राजीनामा आणि पेंटवॉशचा साठा सील करण्याची कारवाई झाल्यानंतर आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि जबाबदारी निश्चित झाल्यानंतर पुढील कारवाई कोणावर होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे






