बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना;सावकारांच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या;
अद्यापही सावकारांना अटक नसल्याची माहिती समोर…पोलीस प्रशासन आरोपींना ताब्यात कधी घेणार ?

बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना;सावकारांच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या;
अद्यापही सावकारांना अटक नसल्याची माहिती समोर…पोलीस प्रशासन आरोपींना ताब्यात कधी घेणार ?
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच सोनाली करे यांचें पती रामभाऊ करे यांनी दि.( १२) जानेवारी रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. याबाबत सोनाली करे यांच्या तक्रारीवरून पंधरा सावकारांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच परिसरात खळबळ उडाली असून बेकायदा सावकारांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
सोनाली करे यांच्या तक्रारीवरून नारायण सोपानराव कोळेकर, पोपट शिवलाल निकम, तुकाराम बाबा थोरात, अंकुश बबन निकम, रशीद शेख ,दशरथ टिकूळे, संतोष माने, कोळेकर (पूर्ण नाव माहिती नाही) व इतर सहा ते सात जण यांच्याविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात बेकायदा सावकारी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, धमकी देणे, अशा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झारगडवाडी येथील रामभाऊ करे यांनी शेतात गळफास लावून आत्महत्या केली. करे हे बँड व्यावसायिक होते. पुणे, सातारा जिल्ह्यात व्यवसायामुळे परिचित असणारे रामभाऊ करे यांच्या पत्नी सोनाली करे या 2023 मध्ये उपसरपंच होत्या. गळफास घेतल्यानंतर सोनाली करे यांनी गावातील सावकार आणि नेत्यांनी कसा अन्याय अत्याचाराचा पाढा वाचला.
लॉकडाऊननंतर मुद्दल फिटता फिटेना
लॉकडाऊन नंतर बंद पडलेला व्यवसाय उभा करण्यासाठी रामभाऊ यांनी गावातील काही सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. सावकारांनी दुप्पट तिप्पट रक्कम परत करून ही रामभाऊ यांच्यामागे व्याजाच्या पैशाच्या वसुलीसाठी तगादा लावून मानसिक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान रामभाऊ करे यांना गावातील नेत्यांनी कचरे वस्तीवरील दत्त मंदिराच्या सभामंडपाचे दहा लाख रुपयांचे कंत्राट सबठेकेदार म्हणून दिले होते. कामाचे बील निघेपर्यत त्याला व्याजाने पैसे दिले. कामाचे बिल निघाल्यावर काम मंजूर करून आणण्याचे कमिशन, बिल काढण्याचे कमिशन, अशा प्रकारचे अनेक खर्च लावून त्याची आर्थिक फसवणूक केली. भरमसाट व्याज लावले, अशी तक्रार सोनाली करे यांनी दिली आहे.