बारामती -फलटण मार्गावर बर्निंग बसचा थरार
बराच वेळ वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

बारामती -फलटण मार्गावर बर्निंग बसचा थरार
बराच वेळ वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
बारामती वार्तापत्र
फलटण-बारामती महामार्गावर बारामती आगारच्या एसटी बसला अचानक आग लागल्याने प्रवाशांना बर्निंग बसचा थरार पहावयास मिळाला. ही घटना शनिवारी दुपारी तीनच्या दरम्यान घडली. चालक व वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व 36 प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने बचावले.
सुदैवाने इंधन (सीनजी) टाकीचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार बारामती आगारातील बारामतीहून दुपारी 2.30 वा. कोल्हापुरला जाणारी (क्र. एम एच 14 बीटी 4971) एसटी बारामती-फलटण महामार्गावरुन 36 प्रवासी घेऊन धावत होती. फलटण हद्दीतील गणेशनगरजवळ आली असता कसलातरी मोठा आवाज झाल्याचे ऐकू आले. काही वेळातच बसच्या खालून बसमध्ये धूर येऊ लागला. प्रसंगावधान दाखवून चालक नाना महादेव बाबर यांनी बस बाजूला घेऊन थांबवली व प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. बस पेटल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी एकच आरडाओरडा व किंचाळ्या सुरू केल्या होत्या.
प्रवाशी बसमधून उतरत असतानाच आग वाढण्यास सुरुवात झाली होती. बसमधील तीन प्रवाशांना खाली उतरण्यास अडचण निर्माण झाली होती; परंतु वाहक महादेव सकरु चव्हाण यांनी आपला जीव धोक्यात घालून तीन प्रवाशांना बाहेर काढले. बसमधील सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले होते. बसमधील काही प्रवाशांचे सामानही जळून खाक झाले.
वाहक मोहन चव्हाण यांनी अग्निशमन दल व पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच फलटण नगरपरिषद, बारामती एमआयडीसी येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. एसटीचे अधिकारीही घटनास्थळी तातडीने पोहोचले होते.
या घटनेमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक पोलिसांनी थांबवली. बराच वेळ वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण आग आटोक्यात आल्यानंतर फलटण शहर पोलिसांनी वाहतूक सुरळीत चालू केली. द बर्निंग बसची घटना पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.