स्थानिक

बारामतीत अजितदादांच्या स्मृतींना भव्य स्वरूप; ३.५ एकर जागेत उभारणार जागतिक दर्जाचे स्मारक

बारामतीच्या वैभवात भर घालणारे नवे प्रेरणास्थळ

बारामतीत अजितदादांच्या स्मृतींना भव्य स्वरूप; ३.५ एकर जागेत उभारणार जागतिक दर्जाचे स्मारक

बारामतीच्या वैभवात भर घालणारे नवे प्रेरणास्थळ

बारामती वार्तापत्र 

बारामतीच्या विकासाचा चेहरा बदलणारे, महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले स्वर्गीय लोकनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी बारामती नगर परिषदेने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दादांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ३.५ एकर जागेत भव्य आणि जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

सभागृहात या प्रस्तावावर चर्चा करताना सर्व सदस्यांनी अजितदादांनी बारामती, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. हे स्मारक केवळ स्मृतीस्थळ न राहता भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरावे, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्ष सचिन सातव यांनी प्रस्ताव मांडताना स्मारकाच्या संकल्पनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी स्मारक उभारले जाणार आहे, त्या ठिकाणी उंच मनोरा उभारून विकसित झालेली बारामती नागरिकांना पाहता यावी, अशी दादांची स्वतःची इच्छा होती. मात्र नियतीच्या खेळामुळे आज त्याच ठिकाणी त्यांच्या स्मृती जपण्यासाठी स्मारक उभारण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दादांचे स्वप्न, विकासदृष्टी आणि जनतेशी असलेले नाते कायम स्मरणात राहावे, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘दादांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य प्रकल्प उभारा’

चर्चेदरम्यान नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी दादांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे दर्जेदार आणि भव्य स्मारक उभारण्याची मागणी केली. अमर धुमाळ यांनी दादांच्या विकासदृष्टीचा गौरव करत स्मारक प्रेरणादायी स्वरूपाचे असावे, असे मत व्यक्त केले. सोमनाथ गजकस यांनी हे स्मारक जागतिक दर्जाचे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर गणेश जोजारे यांनी दादांच्या कार्याच्या उंचीला साजेसा प्रकल्प उभारण्याची सूचना केली. जय पाटील यांनी दादांप्रती असलेले जनतेचे प्रेम अधोरेखित करत असे स्मारक बारामतीच्या वैभवात भर घालणारे ठरेल, असे सांगितले.

स्मारक सर्वांसाठी मोफत खुले ठेवा’

नगरसेवक अमोल कावळे यांनी प्रस्तावाला पाठिंबा देताना महत्त्वाची सूचना मांडली. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी काम केले. त्यामुळे त्यांचे स्मारकही सर्व नागरिकांसाठी कायमस्वरूपी खुले आणि निःशुल्क असावे. स्मारक पाहण्यासाठी येणाऱ्या दादाप्रेमी व नागरिकांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारू नये, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

डिजिटल संग्रहालय, माहितीपट आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याची संकल्पना

सदस्यांनी स्मारकात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अजितदादांच्या जीवनप्रवासाचे डिजिटल सादरीकरण करण्याची सूचना केली. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील महत्त्वाच्या घटना, विकासकामे, राजकीय वाटचाल आणि जनसंपर्क यांचा माहितीपट, चलचित्रे आणि डिजिटल प्रदर्शनांच्या माध्यमातून आढावा सादर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

याशिवाय दादांनी वापरलेल्या वस्तू, छायाचित्रे, दस्तऐवज, सन्मानचिन्हे आणि ऐतिहासिक आठवणी जतन करणारे अत्याधुनिक संग्रहालय उभारण्याचीही कल्पना समोर आली. यामुळे पुढील पिढ्यांना त्यांच्या कार्याचा इतिहास समजून घेण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.

बारामतीच्या वैभवात भर घालणारे नवे प्रेरणास्थळ

सभागृहातील सर्व सदस्यांनी ठरावाला एकमुखाने मंजुरी देत हे स्मारक स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा, विकासदृष्टीचा आणि जनसेवेच्या वारशाचा जिवंत दस्तऐवज ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. बारामतीच्या प्रगतीचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादांच्या कार्याची चिरंतन स्मृती जपणारे हे स्मारक भविष्यात बारामतीची नवी ओळख बनणार असून लाखो नागरिकांसाठी प्रेरणेचे केंद्र ठरणार आहे.

“दादांचे स्वप्न, दादांची विकासदृष्टी आणि दादांचा जनसंपर्काचा वारसा आता स्मारकाच्या रूपाने पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणार आहे,” अशी भावना सभागृहात व्यक्त करण्यात आली.

 

Back to top button