बारामतीत नामांकित व्यापाऱ्याला मारहाण; पोलीस तक्रारीपूर्वीच प्रकरण मिटले?
नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे

बारामतीत नामांकित व्यापाऱ्याला मारहाण; पोलीस तक्रारीपूर्वीच प्रकरण मिटले?
नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील महावीर पत परिसरात एका नामांकित व्यापाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच हाणामारीपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात असून, या घटनेत संबंधित व्यापारी गंभीर जखमी झाला.
मारहाणीमुळे व्यापाऱ्याच्या डोक्याला व चेहऱ्यावर दुखापत झाली असून तो रक्तबंबाळ झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित व्यापाऱ्याची शहरात ओळख असल्याने व्यापारी वर्तुळातही या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, घटनेनंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि अखेर पोलीस तक्रारीपूर्वीच हे प्रकरण मिटल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. काही स्थानिकांनी मध्यस्थी करून वाद अधिक वाढू नये यासाठी समजूत काढल्याचेही बोलले जात आहे.
या प्रकरणाबाबत अधिकृतरीत्या कोणतीही पोलीस तक्रार दाखल झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेचा मुद्दाही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.







