इंदापूर

इंदापूर तालुक्यातील गलांडवाडीमध्ये भरधाव कारचा थरार! दगडाला धडकताच हवेत उडाली व्हेर्ना; अपघात CCTV मध्ये कैद

अनेकदा पलटी, एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

इंदापूर तालुक्यातील गलांडवाडीमध्ये भरधाव कारचा थरार! दगडाला धडकताच हवेत उडाली व्हेर्ना; अपघात CCTV मध्ये कैद

अनेकदा पलटी, एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

इंदापूर ; प्रतिनिध 

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळील गलांडवाडी नंबर १ येथे भरधाव व्हेर्ना कारचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या मैलाच्या दगडाला कारची जोरदार धडक बसल्यानंतर कार हवेत उडून पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारमधील सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी असल्याचे समजते. पुणे-सोलापूर महामार्गावरून कार जात असताना गलांडवाडी नंबर १ परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे.

नियंत्रण सुटल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या मैलाच्या दगडाला जोरदार धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की कार हवेत उडून रस्त्यावर पलटी झाली. त्यानंतर कार अनेक वेळा पलटी झाल्याचे समोर आले असून, या भीषण अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

या अपघाताचा संपूर्ण थरार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये भरधाव वेगाने येणारी कार अचानक नियंत्रणाबाहेर जात मैलाच्या दगडाला धडकताना दिसते. धडकेनंतर कार हवेत उडून पलटी होत असल्याचेही फुटेजमध्ये दिसून येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी बचावकार्य सुरू करून कारमधील जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यानंतर दोन्ही जखमींना तातडीने इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

इंदापूर पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता आणि चालकाचे नियंत्रण कशामुळे सुटले, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या भीषण अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहनचालकांमध्येही काही काळ खळबळ उडाली. या घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत

Back to top button