स्थानिक

ऊस वाहतुकीवर बारामती आरटीओचा कडक वॉच! नियम मोडल्यास कारवाई!

साखर कारखान्यांच्या गेटवर तपासणी

ऊस वाहतुकीवर बारामती आरटीओचा कडक वॉच! नियम मोडल्यास कारवाई!

साखर कारखान्यांच्या गेटवर तपासणी

बारामती वार्तापत्र 

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असताना ऊस वाहतुकीदरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कंबर कसली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरक्षितता, वाहनचालकांची जबाबदारी आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही परिवहन विभागाने दिला आहे.

ओव्हरलोडिंगला आळा; वाहनांवर रिफ्लेक्टिव्ह पट्ट्या बंधनकारक

बारामती येथे आयोजित बैठकीत बारामती कार्यक्षेत्रातील विविध साखर कारखान्यांचे शेती अधिकारी आणि प्रतिनिधींना ऊस वाहतुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. ऊस वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाने वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत. वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरू नये, तसेच वाहनाच्या मागील बाजूस लाल रंगाच्या रिफ्लेक्टिव्ह पट्ट्या लावाव्यात, असे निर्देश देण्यात आले.

विशेषतः रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वाहन दूरून दिसण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह पट्ट्यांचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनचालकांना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अंदाज येऊन संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल.

वेगावर नियंत्रण; मद्यप्राशन आणि मोठ्या आवाजातील स्पीकरला मनाई

ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक करताना वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. मद्यप्राशन करून वाहन चालविणे टाळावे, तसेच वाहनांमध्ये मोठ्या आवाजात स्पीकर लावू नयेत, अशा सूचनाही वाहनचालकांना देण्यात आल्या.

वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे इतर वाहनचालक, दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले.

कारखान्यांच्या प्रवेशद्वारावरच होणार तपासणी

ऊस वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी संबंधित साखर कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाहनांची कागदपत्रे, सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन याकडे कारखाना प्रशासनाने लक्ष द्यावे, असे सांगण्यात आले.

तसेच साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी रस्ता सुरक्षा, वाहतुकीदरम्यान घ्यावयाची काळजी आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रबोधनात्मक शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले.

नियमभंग केल्यास वायुवेग पथकाची कारवाई

वाहतूक सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वायुवेग पथकामार्फत कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे साखर कारखाना प्रशासन आणि ऊस वाहतूकदारांनी नियमांची अंमलबजावणी गांभीर्याने करणे आवश्यक आहे.

या बैठकीस सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे आणि अनिल शेलार यांच्यासह दौंड शुगर, भीमा शुगर, कर्मयोगी शुगर, बारामती ॲग्रो, सोमेश्वर साखर कारखाना, माळेगाव साखर कारखाना आणि छत्रपती साखर कारखान्यांचे शेती अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

ऊस वाहतूक सुरक्षित, नियमबद्ध आणि अपघातमुक्त करण्यासाठी साखर कारखाने, वाहनचालक आणि परिवहन विभाग यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

Back to top button