गणवेशाच्या दर्जावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप! श्वेता नाळेंचा विरोधकांना थेट पलटवार
‘दोष आढळला तर काळ्या यादीत टाकू!

गणवेशाच्या दर्जावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप! श्वेता नाळेंचा विरोधकांना थेट पलटवार
‘दोष आढळला तर काळ्या यादीत टाकू!
बारामती वार्तापत्र
बारामतीतील शालेय गणवेशाच्या दर्जावरून राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांच्या आरोपांना बारामती नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष तथा शिक्षक सभापती श्वेता नाळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाच्या कापडाच्या दर्जाबाबत तक्रारी आणि आरोप झाल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाकडून बारामतीतील १७ शाळांमध्ये गणवेशाची तपासणी करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांचे गणवेश नमुने शासनमान्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, आता या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“प्रयोगशाळेच्या अहवालात गणवेशाच्या कापडात दोष आढळल्यास संबंधित वेंडरवर दंडात्मक कारवाई केली जाईल. एवढेच नव्हे तर संबंधित वेंडरला काळ्या यादीत टाकण्यात येईल,” अशी स्पष्ट भूमिका श्वेता नाळे यांनी मांडली.
दरम्यान, गणवेशाच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवरही त्यांनी सवाल उपस्थित केला. तसेच आरती शेंडगे गव्हाळे या बारामती नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्या नसून, दोन नगरसेवकांच्या ‘बारामती सर्वांगीण विकास आघाडी’च्या गटनेत्या आहेत, असा दावा नाळे यांनी केला.
त्यामुळे गणवेशाचा दर्जा, प्रयोगशाळेचा अहवाल आणि नगरपरिषदेतील राजकीय आरोप-प्रत्यारोप यामुळे बारामतीतील हे प्रकरण आता अधिकच चर्चेत आले आहे.
आता प्रयोगशाळेचा अहवाल काय सांगतो आणि दोष आढळल्यास नगरपरिषद प्रत्यक्षात कोणती कारवाई करते, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.






