बारामतीत आठवडे बाजारावरून संघर्ष; ‘फुकट कलिंगड’ आंदोलनाने नगरपरिषदेसमोर लक्षवेधी निषेध
‘बाजार बंद, मग कलिंगड कुठे विकायचे?’ मिथुन आटोळेंचा नगरपरिषदेसमोर सवाल

बारामतीत आठवडे बाजारावरून संघर्ष; ‘फुकट कलिंगड’ आंदोलनाने नगरपरिषदेसमोर लक्षवेधी निषेध
‘बाजार बंद, मग कलिंगड कुठे विकायचे?’ मिथुन आटोळेंचा नगरपरिषदेसमोर सवाल
बारामती वार्तापत्र
गुरुवार आणि रविवारचा आठवडे बाजार बंद करण्याच्या नगरपरिषदेच्या निर्णयाविरोधात आता आंदोलनाची धार वाढताना दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ते मिथुन आटोळे यांनी बारामती नगरपरिषदेसमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करत नागरिकांना चक्क मोफत कलिंगड वाटप केले.
बारामती शहरातील गणेश मार्केट आणि सूर्यनगरी परिसरातील आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठरावांच्या आधारे गुरुवार आणि रविवारच्या बाजारावर बंदी लागू करण्यात आली असून, बाजार भरविल्यास साहित्य जप्त करून कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
या निर्णयाला शेतकरी, विक्रेते आणि विविध संघटनांकडून विरोध होत आहे. बाजार बंद करण्याऐवजी वाहतूक, अतिक्रमण, पार्किंग आणि स्वच्छतेच्या समस्या सोडवून बाजारासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर मिथुन आटोळे यांनी नगरपरिषदेसमोर ‘फुकट कलिंगड’ वाटप आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. बाजार बंद झाल्यानंतर शेतकरी आणि छोट्या विक्रेत्यांनी आपला शेतमाल कुठे विकायचा, असा सवाल या आंदोलनातून उपस्थित करण्यात आला.
आठवडे बाजार हा अनेक शेतकरी आणि छोट्या विक्रेत्यांसाठी थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचवण्याचे माध्यम असल्याचे बाजार समर्थकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, बाजारामुळे वाहतूक कोंडी, पार्किंग, कचरा आणि स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा प्रशासनाच्या निर्णयामागे असल्याचे स्थानिक नगरसेवकांनी सांगितले आहे.
त्यामुळे आता ‘बाजार बंद ठेवायचा की पर्यायी व्यवस्था करून बाजार सुरू ठेवायचा?’ हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिथुन आटोळेंच्या अनोख्या कलिंगड आंदोलनानंतर नगरपरिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.






