नवसाची अनोखी कहाणी! कृषिमंत्री होताच कार्यकर्त्याला दत्तामामांकडून कोल्हापुरी भेट
‘मामा कृषिमंत्री व्हावेत’ म्हणून चप्पल सोडली; इच्छा पूर्ण होताच मामांनी घातली चप्पल!

नवसाची अनोखी कहाणी! कृषिमंत्री होताच कार्यकर्त्याला दत्तामामांकडून कोल्हापुरी भेट
‘मामा कृषिमंत्री व्हावेत’ म्हणून चप्पल सोडली; इच्छा पूर्ण होताच मामांनी घातली चप्पल!
इंदापूर : प्रतिनिधि
“शेतकऱ्याचा मुलगा कृषिमंत्री व्हावा” या इच्छेखातर एका कार्यकर्त्याने चक्क पायात चप्पल घालणे सोडून दिले होते. दत्तात्रय भरणे कृषिमंत्री झाल्यानंतर या कार्यकर्त्याचा अनोखा नवस अखेर पूर्ण झाला. विशेष म्हणजे दत्तामामा भरणे यांनी स्वतःच्या निवासस्थानी या कार्यकर्त्याला महाराष्ट्राची ओळख असलेली कोल्हापुरी चप्पल भेट देत ती स्वतः घालायला लावली.
या भावनिक प्रसंगाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अनेक दिवस चप्पल न घालता फिरणाऱ्या कार्यकर्त्याने आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर मामांच्या भेटीला जात नवसाची पूर्तता केली.
दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावचे असून, शेतकरी कुटुंबातून आणि कोणताही राजकीय वारसा नसलेल्या पार्श्वभूमीतून पुढे आलेला त्यांचा प्रवास अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आणि श्रद्धेचा विषय ठरला आहे.
विशेष म्हणजे या कार्यकर्त्याची आणखी एक इच्छा असून, ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र ती इच्छा पूर्ण झाल्याचे संकेत स्वतः दत्तामामांनी दिल्याने या दुसऱ्या मागणीबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
या भावनिक क्षणी दत्तामामा भरणे म्हणाले, “त्याची इच्छा पूर्ण झाली आहे म्हणून मला देखील आज आनंद आहे.”
एका कार्यकर्त्याचा नवस, मामांवरील श्रद्धा आणि कोल्हापुरी चप्पल घालण्याचा हा अनोखा क्षण सध्या इंदापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.






