क्राईम रिपोर्ट

गणेशोत्सवात शिस्तभंग करणाऱ्यांची खैर नाही! बारामती पोलिसांची ५ अधिकारी, ५० कर्मचाऱ्यांची विशेष मोहीम

मॉडिफाइड सायलेन्सरवर दंडात्मक कारवाई

गणेशोत्सवात शिस्तभंग करणाऱ्यांची खैर नाही!
बारामती पोलिसांची ५ अधिकारी, ५० कर्मचाऱ्यांची विशेष मोहीम

मॉडिफाइड सायलेन्सरवर दंडात्मक कारवाई

बारामती वार्तापत्र 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासोबतच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बारामती पोलिसांनी विशेष वाहतूक तपासणी मोहीम राबवली. बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी चैतन्य कदम यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकारी आणि ५० पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने शहरातील विविध भागांत धडक कारवाई केली.

या मोहिमेदरम्यान भिगवण रोड, एमआयडीसी परिसरातील पेन्सिल चौक आणि गदिमा रोड येथे वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. ट्रिपल सीट प्रवास, दुचाकींचे बेकायदेशीर मॉडिफिकेशन, मॉडिफाइड सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांवरही नियमभंगाबाबत कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक, मिरवणुका आणि गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी, ध्वनीप्रदूषण तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे डीवायएसपी चैतन्य कदम यांनी सांगितले.

पोलिसांच्या अचानक कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांमध्ये चांगलीच धावपळ उडाली. गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बारामती पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Back to top button