“चेअरमन हटवा अन् चौकशी बसवा!” सोमेश्वर कारखान्यावर सतीश काकडेंचा घणाघात
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी कृती समिती

“चेअरमन हटवा अन् चौकशी बसवा!” सोमेश्वर कारखान्यावर सतीश काकडेंचा घणाघात
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी कृती समिती
सोमेश्वरनगर | प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपूर्वीच कारखान्याच्या कारभाराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. शेतकरी कृती समितीच्या मेळाव्यात नेते सतीश काकडे यांनी कारखान्याच्या नेतृत्वावर आणि आर्थिक-प्रशासकीय कारभारावर जोरदार टीका करत “आधी चेअरमनला हटवा आणि कारभाराची चौकशी करा,” अशी मागणी केली.
कारखान्याच्या कारभाराची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी CBI, SIT किंवा EDसारख्या तपास यंत्रणांचा पर्याय काकडे यांनी मांडला. मात्र कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची, याचा अंतिम निर्णय सक्षम यंत्रणांनी घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
35-40 वर्षे एकच संचालक राहिल्याचा मुद्दा उपस्थित करत नेतृत्वबदलाची गरज असल्याचे काकडे यांनी सांगितले. कारखान्याच्या कारभारासंदर्भात आपल्याकडे माहिती आणि पुरावे असल्याचा दावा करत योग्य वेळी हे पुरावे समोर आणणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कृती समिती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले. मात्र हा पाठिंबा केवळ निवडणुकीपुरता नसून कारखान्याच्या हितासाठी पारदर्शक कारभार, सभासदांच्या प्रश्नांना न्याय आणि नव्या नेतृत्वाला संधी मिळणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर चौकशी, नेतृत्वबदल आणि पारदर्शक कारभाराचे मुद्दे पुढे आल्याने आगामी राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.






