स्थानिक

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचा लाभ घ्या; २ ऑगस्टला सोमेश्वरनगर येथे आयोजन

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष सुविधा

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचा लाभ घ्या; २ ऑगस्टला सोमेश्वरनगर येथे आयोजन

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष सुविधा

बारामती वार्तापत्र 

महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ २ ऑगस्ट रोजी सोमेश्वरनगर येथील शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले.

महसूल समाधान शिबिराच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सचिन यादव, तहसीलदार स्वप्नील रावडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उत्तम दिघे म्हणाले की, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ या शिबिरातून दिला जाणार आहे.

शिबिरामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमितीकरण, जिवंत सातबारा मोहीम, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष सुविधा, कुंभार समाजासाठी पारंपरिक व्यवसाय सवलती, कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफी, तसेच रहिवासी, उत्पन्न, जातीचे दाखले आणि शिधापत्रिका वाटप करण्यात येणार आहे.

याशिवाय संजय गांधी निराधार योजना, पीएम-किसान योजना, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ अभिलेख दुरुस्ती, ई-मोजणी, शेतकरी ओळखपत्र, आधारकार्ड दुरुस्ती, विविध महसुली प्रमाणपत्रांचे वितरण, भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि एसटी महामंडळामार्फत एनसीएमसी कार्ड वाटप आदी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D