स्थानिक

ज्येष्ठांचा अनुभव, नवोदितांचा उत्साह अन् छायाचित्रकारांची एकजूट; बारामतीत फोटोग्राफी दिन अविस्मरणीय

‘एकत्र राहू, एकमेकांना सहकार्य करू’

ज्येष्ठांचा अनुभव, नवोदितांचा उत्साह अन् छायाचित्रकारांची एकजूट; बारामतीत फोटोग्राफी दिन अविस्मरणीय

‘एकत्र राहू, एकमेकांना सहकार्य करू’

बारामती वार्तापत्र 

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त बारामती शहर व परिसरातील छायाचित्रकारांनी एकत्र येत हा दिवस उत्साहात साजरा केला. बारामती फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने नटराज नाट्य कलामंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील दीडशेहून अधिक फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कॅमेरा पूजनाने करण्यात आली. छायाचित्रण क्षेत्राप्रती आदर व्यक्त करत या माध्यमाच्या माध्यमातून समाजातील विविध क्षण जतन करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय ठाकरे यांच्यासह फैय्याज शेख, गिरीश काळे, भैया इनामदार, महिंद्र मांडगे, मनोज वाईकर, विशाल साळुंखे, स्वप्निल शिंदे, सचिन सावंत, महेश लोणकर, प्रशांत कुचेकर आदी उपस्थित होते.

ज्येष्ठांकडून नवोदितांना मार्गदर्शन

कार्यक्रमात परिसरातील ज्येष्ठ व अनुभवी फोटोग्राफरांनी तरुण आणि नवोदित छायाचित्रकारांशी संवाद साधला. छायाचित्रणातील बारकावे, उत्तम काम करण्याच्या पद्धती तसेच व्यवसायातील अनुभव याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रत्येक फोटोग्राफरला रोपटे भेट

कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित प्रत्येक फोटोग्राफरचे रोपटे भेट देऊन पर्यावरणपूरक स्वागत करण्यात आले. सचिन सावंत यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. छायाचित्रणासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.

एकत्रित राहण्याची शपथ

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत फोटोग्राफी क्षेत्राच्या प्रगतीसाठी कायम एकत्र राहून परस्परांना सहकार्य करण्याची शपथ घेतली. यानंतर अजित दादा पवार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

बारामती फोटोग्राफर असोसिएशनची लवकरच नवी कार्यकारिणी

या कार्यक्रमाचे औचित्य साधून बारामती फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. असोसिएशनचा कारभार अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी लवकरात लवकर नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याची विनंती त्यांनी केली.

त्यानुसार आगामी काही दिवसांत बारामती फोटोग्राफर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी गठीत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ज्येष्ठ, अनुभवी तसेच नवोदित छायाचित्रकारांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जागतिक फोटोग्राफी दिनाचा हा कार्यक्रम बारामतीत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

Back to top button