डिजिटल युगात सायबर सुरक्षेचा धडा; कुरवलीतील विद्यार्थ्यांचा जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
ऑनलाइन आमिषांपासून सावध

डिजिटल युगात सायबर सुरक्षेचा धडा; कुरवलीतील विद्यार्थ्यांचा जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
ऑनलाइन आमिषांपासून सावध
कुरवली | प्रतिनिधी :
डिजिटल माध्यमांचा वाढता वापर आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत कर्मयोगी शंकरराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, कुरवली, ता. इंदापूर येथे इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, बनावट संकेतस्थळे, संशयास्पद लिंक, फसवे फोन व संदेश, ओटीपी, गोपनीय संकेतशब्द, सोशल मीडिया खात्यांची सुरक्षितता, क्यूआर कोडद्वारे होणारी फसवणूक तसेच विविध ऑनलाइन आमिषांपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या. अनोळखी व्यक्तींच्या फोनवर विश्वास न ठेवणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे, ओटीपी अथवा गोपनीय माहिती कोणालाही न देणे आणि ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी खात्री करणे, याबाबत विद्यार्थ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या.
‘क्लिक करण्यापूर्वी विचार करा’चा संदेश
‘क्लिक करण्यापूर्वी विचार करा’ हा संदेश देत विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित, सजग आणि जबाबदार वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रश्नोत्तरांचे सत्रही घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले.
फसवणूक प्रतिबंधक अॅपचे सक्रियकरण
उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी फसवणूक प्रतिबंधक अॅपची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये अॅपचे सक्रियकरण करून देतानाच त्याचा वापर आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना केवळ तंत्रज्ञान अवगत असणे पुरेसे नसून त्याचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करणेही आवश्यक आहे, यावर यावेळी भर देण्यात आला.
या जनजागृती उपक्रमाला कर्मयोगी शंकरराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘सावधानता हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी’ हा संदेश देत विद्यार्थ्यांना सुरक्षित, सजग आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनविणे, हा या संयुक्त उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.






