हातात पेटती सिगारेट अन् समोर पेटलेली बाईक; बारामतीच्या सुभाष चौकात खळबळ!
नागरिकांच्या जीवितास धोका

हातात पेटती सिगारेट अन् समोर पेटलेली बाईक; बारामतीच्या सुभाष चौकात खळबळ!
नागरिकांच्या जीवितास धोका
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील गजबजलेल्या सुभाष चौक मार्केट परिसरात भर रस्त्यावर पेट्रोल असलेली मोटारसायकल जाणीवपूर्वक पेटवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित इसमाला ताब्यात घेतले. अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
सोमवारी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास सुभाष चौकात एका व्यक्तीने मोटारसायकल पेटवून दिल्याची तसेच तो आरडाओरडा व गोंधळ करीत असल्याची माहिती बारामती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ पथक घटनास्थळी रवाना केले.
पोलिस घटनास्थळी पोहोचले असता हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल (MH-13-Q-0673) भर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पेटलेली दिसून आली. मोटारसायकलमधून मोठ्या ज्वाळा आणि धूर निघत होता. विशेष म्हणजे मोटारसायकलच्या टाकीत पेट्रोल असल्याने आग भडकण्याचा तसेच पेट्रोल टाकीचा स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला होता.
हातात पेटती सिगारेट घेऊन आरडाओरडा
पोलिसांनी मोटारसायकलीजवळ असलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आपले नाव गणेश विठ्ठल माने (वय ३९), रा. कैकाडगल्ली, बुरुडगल्ली रोड, बारामती, असे सांगितले. पेटलेली मोटारसायकल स्वतःच्या मालकीची असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, नागरिक व वाहनांची मोठी वर्दळ असताना संबंधित व्यक्तीने सार्वजनिक रस्त्यावर पेट्रोल असलेली मोटारसायकल पेटवून दिली. धक्कादायक बाब म्हणजे तो पेटलेल्या मोटारसायकलीपासून दूर जाण्याऐवजी तिच्याभोवती फिरत होता. त्याच्या हातात पेटती सिगारेट असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
सुभाष चौक हा बारामती शहरातील अत्यंत वर्दळीचा बाजारपेठेचा परिसर आहे. सकाळच्या वेळी दुकानदार, नागरिक, पादचारी तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ सुरू होती. त्यामुळे आग जवळील वाहनांपर्यंत, दुकानांपर्यंत किंवा इमारतींपर्यंत पोहोचल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर अग्निशामक दलाशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने मोटारसायकलची आग विझविण्यात आली. वेळीच केलेल्या संयुक्त कारवाईमुळे आग इतर वाहनांपर्यंत किंवा दुकाने-इमारतींपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात आली.
या घटनेमुळे सुभाष चौकातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. प्राथमिक पाहणीत या आगीमुळे अन्य वाहन, दुकान किंवा इमारतीचे नुकसान झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलीस शिपाई विशाल गोरख चौधर यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८५, २९२, २८७ आणि ३२४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे धोकादायक कृत्य होत असल्यास नागरिकांनी गर्दी न करता तातडीने पोलिसांना किंवा आपत्कालीन यंत्रणेला माहिती द्यावी.
“नागरिकांची सुरक्षितता ही पोलिसांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. बेजबाबदार अथवा धोकादायक कृत्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास अशा प्रकारांची तात्काळ दखल घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे बारामती शहर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेवा लोंढे करीत आहेत.






