स्थानिक

पुणे जिल्हा परिषदेत खळबळ; बारामतीच्या राष्ट्रवादी सदस्य मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा

मात्र, पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

पुणे जिल्हा परिषदेत खळबळ; बारामतीच्या राष्ट्रवादी सदस्य मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा

मात्र, पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

बारामती वार्तापत्र 

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत एका तरुणीने सभागृहात अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना संबंधित तरुणी अचानक सभागृहात दाखल झाली. तिच्याकडे असलेल्या बाटलीतील पेट्रोल तिने अंगावर ओतताच सभागृहात एकच गोंधळ उडाला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत तिला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेनंतर संबंधित तरुणीने माध्यमांशी बोलताना मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले. अनेक वर्षे लग्नाचे आश्वासन देत आपली फसवणूक करण्यात आल्याचा दावा तिने केला. अनेकदा न्याय मिळविण्याचा प्रयत्न करूनही दखल घेतली गेली नसल्याने नैराश्यातून आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिने सांगितले.

दरम्यान, या आरोपांबाबत मंगेश जगताप यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. पोलिस सर्व बाजूंनी चौकशी करत असून तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

या घटनेमुळे बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थतेची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी पक्षाशी संबंधित काही वादग्रस्त घटनांमुळे स्थानिक पातळीवर पक्षाला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यात आता या नव्या प्रकरणाची भर पडल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची कायदेशीर पडताळणी आणि तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य ठरणार नसल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D