इंदापुरात भाजपचा रक्तदान महायज्ञ; २०१ रक्तपिशव्यांचे संकलन
भाजपचा रक्तदान, वृक्षारोपण आणि मतदार जनजागृतीचा उपक्रम; 'मन की बात' कार्यक्रमाचेही सामूहिक श्रवण

इंदापुरात भाजपचा रक्तदान महायज्ञ; २०१ रक्तपिशव्यांचे संकलन
भाजपचा रक्तदान, वृक्षारोपण आणि मतदार जनजागृतीचा उपक्रम; ‘मन की बात’ कार्यक्रमाचेही सामूहिक श्रवण
इंदापूर, आदित्य बोराटे –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, इंदापूर तालुक्याच्या वतीने रविवारी राधाई हॉल येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर चाललेल्या या शिबिरात तब्बल २०१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
एसबीआय बँकेसमोरील राधाई हॉल येथे आयोजित या शिबिरात युवक, महिला, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने स्वेच्छेने रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा उत्सव विधायक उपक्रमातून साजरा करण्यात आला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले. राष्ट्रहित, सामाजिक सहभाग आणि नागरिकांच्या कर्तव्यभावनेबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) संदर्भात बैठक घेण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी, पडताळणी, जनजागृती आणि बूथस्तरीय नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर आणि युवा नेते प्रविण माने यांनी कार्यकर्त्यांना SIR मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सूचना केल्या.
दरम्यान, भाजप महिला मोर्चाच्या वतीने इंदापूर येथील जोतिबा मंदिर परिसरात १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर, युवा नेते प्रविण माने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, महिला मोर्चाच्या पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी मुक्ताई ब्लड बँक, इंदापूर यांचे सहकार्य लाभले. आयोजकांनी रक्तदाते, स्वयंसेवक आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.







