बारामतीतील पतंगशहा नगरात आगीचा कहर; जवानांच्या तत्परतेने सिलिंडरचा धोका टळला
“शॉर्ट सर्किटचा संशय; दोन दुकाने आगीच्या विळख्यात

बारामतीतील “पतंगशहा नगरात आगीचा तांडव! तीन सिलिंडर धोक्यात; अग्निशमन जवानांच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला!”
“शॉर्ट सर्किटचा संशय; दोन दुकाने आगीच्या विळख्यात
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील पतंगशहा नगर, रिंग रोड परिसरात शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास थोरात कॅटरर्सच्या दुकानाला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत लगतच्या दोन दुकानांनाही आपल्या विळख्यात घेतले.
आगीची माहिती मिळताच फायर ऑफिसर निखिल कागडा यांच्या नेतृत्वाखाली बारामती अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुकानात तीन एलपीजी सिलिंडर आणि एक दुचाकी असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती.
जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करत हाय-प्रेशर होज रीलच्या सहाय्याने ब्रोकन स्ट्रीम पद्धतीने पाण्याचा मारा केला. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे सिलिंडरमुळे होणारा संभाव्य मोठा अनर्थ टळला तसेच परिसरातील आणखी दुकाने आगीच्या विळख्यात जाण्यापासून वाचली.
ही धाडसी कारवाई फायर ऑफिसर निखिल कागडा, फायरमन उमेश लाळबिगे, प्रदीप लाळबिगे, मदतनीस सुशील सोनवणे, अनिल सरोडे, वाहनचालक निवृत्ती जाधव आणि बाळू कबीर यांच्या पथकाने केली.
आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा तपशील पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.






