बारामतीत गोळीबाराच्या आवाजाने सूर्यनगरी हादरली! २८ वर्षीय युवक गंभीर; ‘शस्त्र आले कुठून?’ प्रेमसंबंधाची चर्चा, पण दुजोरा नाही
पिस्तुल कुठून आले?

बारामतीत गोळीबाराच्या आवाजाने सूर्यनगरी हादरली! २८ वर्षीय युवक गंभीर; ‘शस्त्र आले कुठून?’ प्रेमसंबंधाची चर्चा, पण दुजोरा नाही
पिस्तुल कुठून आले?
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील सूर्यनगरी लेन क्रमांक ५ येथील जयश्री अपार्टमेंटमध्ये शनिवारी (१२ सप्टेंबर) दुपारी धक्कादायक घटना घडली. या घटनेत अविष्कार ढोले (वय २८, मूळ रा. पंढरपूर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. तो या अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत असल्याची माहिती आहे.
दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.
घटनेमागचे कारण काय?
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, तरुणाने स्वतःवर गोळी झाडल्याचे समोर आले आहे. मात्र घटनेमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, तरुणाचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या संबंधाची माहिती महिलेच्या पतीला झाल्यानंतर ही घटना घडल्याचीही प्राथमिक चर्चा आहे. मात्र, या चर्चेला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या चर्चेच्या आधारे घटनेचे कारण निश्चित मानता येणार नाही.
घातपाताची शक्यताही तपासाच्या कक्षेत
ही घटना नेमकी कोणत्या परिस्थितीत घडली, यासह अन्य कोणाचा सहभाग होता का, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी शस्त्रासह उपलब्ध पुरावे ताब्यात घेतले आहेत.
तरुणाच्या मोबाईलमधील माहिती, संपर्क आणि घटनेपूर्वीच्या हालचाली तपासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार आहेत. घटनेमागील सत्य आणि नेमका घटनाक्रम पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.






