क्राईम रिपोर्ट

आधी हत्याराने वार… नंतर गळा आवळला! पणदरेतील हत्येने बारामतीत खळबळ

घरातील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

आधी हत्याराने वार… नंतर गळा आवळला! पणदरेतील हत्येने बारामतीत खळबळ

घरातील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील पणदरे येथे ३० वर्षीय विवाहितेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १२) रात्री उघडकीस आली. घरातील खोलीत अज्ञात व्यक्तीने महिलेच्या डोक्यात व चेहऱ्यावर हत्याराने वार केल्यानंतर टॉवेलने गळा आवळून तिचा जीव घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने पणदरे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वैशाली तानाजी पवार (वय ३०, रा. पणदरे, ता. बारामती) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या सासू रंजना लक्ष्मण पवार (वय ५०) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे अडीच वाजल्यापासून रात्री ७.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत तानाजी लक्ष्मण पवार यांच्या राहत्या घरातील खोलीत हा हल्ला झाल्याचा संशय आहे. अज्ञात कारणातून वैशाली यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर हत्याराने वार करण्यात आले. त्यानंतर टॉवेलने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

वैशाली यांचे पती कामानिमित्त वडगाव निंबाळकर येथे गेले होते. रात्री घरी परतल्यानंतर त्यांना पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. खुनासाठी नेमके कोणते हत्यार वापरण्यात आले, हल्ल्यामागचे कारण काय आणि हा प्रकार नेमका कोणी केला, याचा तपास सुरू आहे.

याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४६/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस उपनिरीक्षक ओमासे यांनी केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करीत आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, परिसरातील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

Back to top button