स्थानिक

बारामतीत कामगार शक्ती रस्त्यावर! ११ मागण्यांसाठी जनशक्ती कामगार संघाचे निवेदन

‘नोकरी वाचवा, हक्क जपा’चा नारा!

बारामतीत कामगार शक्ती रस्त्यावर! ११ मागण्यांसाठी जनशक्ती कामगार संघाचे निवेदन

‘नोकरी वाचवा, हक्क जपा’चा नारा!

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषदेच्या नवीन कंत्राट प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर २०२६) नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून सुरू झालेला मोर्चा नगरपरिषदेसमोर पोहोचल्यानंतर तेथे सभा घेण्यात आली. त्यानंतर संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

नवीन ठेक्यात कामगार कपात न करण्याची मागणी

बारामती नगरपरिषदेत सध्या कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नवीन ठेक्यात कायम ठेवावे आणि कोणत्याही कामगाराला कमी करू नये, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. यासोबतच कामगारांना नियमानुसार किमान वेतन, पीएफ, ESIS, बोनस आणि साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

PF-ESISची चौकशी करण्याची मागणी

तत्कालीन ठेकेदारांनी कामगारांच्या PF आणि ESISची रक्कम नियमानुसार भरली आहे किंवा नाही, याची सखोल चौकशी करावी. चौकशी करताना संबंधित कामगारांचे म्हणणे ऐकून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारांची सुरक्षा अनामत रक्कम परत देऊ नये आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिकाही संघटनेने मांडली.

स्थानिक ठेकेदारांना संधी देण्याची मागणी

बारामतीतील स्थानिक ठेकेदारांना कंत्राट मिळण्यासाठी आवश्यकतेनुसार नियम व अटी शिथिल कराव्यात. तसेच कंत्राटी कामगारांची दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी करण्यात यावी आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

अपघाताचा खर्च कामगारांच्या वेतनातून कपात करू नये

कामावर असताना वाहनाचा अपघात झाल्यास त्याचा खर्च कामगारांच्या वेतनातून कपात करू नये, तर संबंधित ठेकेदाराने तो खर्च करावा. प्रत्येक कामगाराला पेमेंट स्लिप देण्यात यावी आणि दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

कामगाराला सेवेतून कमी करताना नियमानुसार नोटीस द्यावी. कामाच्या कालावधीत अपघात झाल्यास संबंधित ठेकेदाराने वैद्यकीय खर्च करावा तसेच उपचार व रजेच्या कालावधीतील वेतनाबाबत नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.

सभेत पदाधिकाऱ्यांची मनोगते

मोर्चानंतर झालेल्या सभेत नगरसेवक आरती शेंडगे (गव्हाळे), सामाजिक कार्यकर्ते मुनीर तांबोळी, अक्षय खरात, भारतीय युवा पँथर संघटनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम गायकवाड आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने मोर्चाला पाठिंबा देण्यात आला.

त्यानंतर नगरपरिषद अधिकाऱ्यांना संघटनेच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कंत्राटी कामगारांच्या हक्कांशी संबंधित मागण्यांची तातडीने दखल घेऊन नवीन कंत्राट प्रक्रियेत कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोर्चात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग

जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे, बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष शंकर शिंदे, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, सरचिटणीस सुरज वाडेकर, तालुकाध्यक्ष विशाल जगताप, तालुका कार्याध्यक्ष प्रेम खरात यांच्यासह महिला आघाडीचे पदाधिकारी, एमआयडीसी विभागाचे पदाधिकारी आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय युवा पँथर संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष सुषमा पवार, सदस्य मंजुषा भंडारे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सहभाग नोंदवला.

कंत्राटी कामगारांच्या रोजगाराची हमी, वेतन व सामाजिक सुरक्षेशी संबंधित मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता कामगारांचे लक्ष लागले आहे.

Back to top button