बारामतीत बूथ कमिटीवरून वादंग; मारहाणीच्या प्रयत्नापर्यंत प्रकरण पोहोचले
शाब्दिक धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याच्याही चर्चा आहेत.

बारामतीत बूथ कमिटीवरून वादंग; मारहाणीच्या प्रयत्नापर्यंत प्रकरण पोहोचले
शाब्दिक धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याच्याही चर्चा आहेत.
बारामती वार्तापत्र
बारामती पोटनिवडणुकीनंतर बूथ कमिटीच्या कार्यप्रणालीवरून मोठा वाद उफाळून आला असून, या पार्श्वभूमीवर संबंधित बूथ कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याबाबत शहराध्यक्ष किरण इंगळे यांनी संकेत दिले आहेत. माहितीनुसार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान बूथ कमिट्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, २३ एप्रिल रोजी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत या कमिट्यांच्या कामकाजातील अनेक त्रुटी समोर आल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे.
त्यामुळे ही कमिटी बरखास्त करण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, बूथ कमिटीच्या वादातून बारामती तालुक्यातील एका गावात गंभीर प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
एका माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य यांच्यातील वाद इतका चिघळला की, माजी सरपंचावर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी कार्यकर्त्यांकडून शाब्दिक धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याच्याही चर्चा आहेत. हा संपूर्ण प्रकार माळेगाव पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला असून, पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरू असल्याचे समजते.
विशेष म्हणजे, हा वाद जेवणाच्या बिलावरून सुरू झाल्याचेही बोलले जात आहे. या सर्व घटनांमुळे बारामतीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, पक्षातील अंतर्गत शिस्त आणि संघटनात्मक रचनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






