बारामतीत विद्युत सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ; प्रवाशांमध्ये जनजागृती अभियान
२ जुलैपर्यंत विविध उपक्रम

बारामतीत विद्युत सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ; प्रवाशांमध्ये जनजागृती अभियान
२ जुलैपर्यंत विविध उपक्रम
बारामती वार्तापत्र
विद्युत अपघातांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ आज (२६ जून) बारामती बस स्थानक येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या हस्ते सकाळी १० वाजता झाले.
यावेळी बस स्थानकातील प्रवाशांना विद्युत अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय, सुरक्षित उपकरणांचा वापर आणि विद्युत सुरक्षेचे नियम पाळण्याबाबत माहिती देण्यात आली. नगराध्यक्ष सचिन सातव यांनी महावितरणच्या या उपक्रमाचे कौतुक करत सुरक्षा सप्ताहासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत स्वतः प्रवाशांना माहितीपत्रकांचे वाटप करून विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती केली.
कार्यक्रमाला महावितरण बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश जमाले, सहाय्यक अभियंता कानतोडे, येळे, ठोंबरे, सौ. ननावरे तसेच महावितरणचे तांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२ जुलैपर्यंत विविध उपक्रम
विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने २ जुलैपर्यंत बारामती परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि निवासी सोसायट्यांमध्ये विद्यार्थ्यांचे व ग्राहकांचे प्रबोधन, महावितरण कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच विद्युत सुरक्षा जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅलीसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.






