क्राईम रिपोर्ट

बंदुकीचा धाक दाखवून लुटलेले ६.६५ लाखांचे दागिने व रोकड फिर्यादीला परत; बारामती तालुका पोलिसांची तत्पर कारवाई

एकूण ६.६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

बंदुकीचा धाक दाखवून लुटलेले ६.६५ लाखांचे दागिने व रोकड फिर्यादीला परत; बारामती तालुका पोलिसांची तत्पर कारवाई

एकूण ६.६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

बारामती वार्तापत्र 

:बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकत लंपास केलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ६ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत हस्तगत करून फिर्यादीला परत दिला आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्पर तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल २०२६ रोजी एमआयडीसी बारामती येथील कल्याणी कॉर्नर परिसरात फिर्यादी विवेक ज्ञानेश्वर शिंदे (रा. शिंदेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) आणि त्यांचे मित्र मोहित गवंडगावे यांना पाच अनोळखी व्यक्तींनी अडवले. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपींना बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिनार मास कंपनीजवळ ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

* रवी संजय माने (रा. कुंभारकर वस्ती, वंजारवाडी)
* श्रीकांत अर्जुन घुले (रा. खताळपट्टा, बारामती)
* अभिषेक भाऊसाहेब ठोंबरे (रा. खताळपट्टा, बारामती)
* अतुल मोहन भोलनकर (रा. कुंभारकर वस्ती, वंजारवाडी)

आरोपींकडे केलेल्या चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर त्यांच्या ताब्यातून लुटलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६.६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयीन प्रक्रियेनंतर हा मुद्देमाल फिर्यादी विवेक शिंदे यांच्याकडे परत सुपूर्द करण्यात आला.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, उपनिरीक्षक भगत मॅडम, कल्याण शिंगाडे, सुरेंद्र वाघ, खारतोडे, एकसिंगे, ढवाण, भारती खंडागळे, निलेश वाकळे, मनोज पवार, दराडे आदी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

दरोड्यात लुटलेला मुद्देमाल हस्तगत करून तो मूळ मालकाला परत देण्यात आल्याने फिर्यादीने बारामती तालुका पोलिसांचे आभार मानले आहेत.

Back to top button