स्थानिक

बारामती बसस्थानकापासून ५०० मीटरवर बस थांब्याचा मनमानी कारभार; रुग्णवाहिकाही कोंडीत!

बस थांबविण्याची ठिकाणे निश्चित करावीत

बारामती बसस्थानकापासून ५०० मीटरवर बस थांब्याचा मनमानी कारभार; रुग्णवाहिकाही कोंडीत!

बस थांबविण्याची ठिकाणे निश्चित करावीत

बारामती वार्तापत्र 

बारामती बसस्थानकाच्या बाहेर अवघ्या ५०० मीटर अंतरावर अधिकृत बसथांबा नसतानाही एस.टी. बसेस रस्त्यावरच थांबवून प्रवाशांची चढ-उतार केली जात असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. बस रस्त्यात उभी राहत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असून, या कोंडीत रुग्णवाहिका अडकण्याचे प्रकारही समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

बसस्थानकातून बाहेर पडलेली बस काही अंतरावरच रस्त्यात थांबवली जाते. प्रवाशांना चढविणे-उतरविण्यासाठी बस रस्त्यावरच उभी राहत असल्याने मागील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. गर्दीच्या वेळेत परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

विशेष म्हणजे, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत अडकली तर रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एस.टी. प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नियम केवळ सामान्य वाहनचालकांसाठी?

बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. मात्र अधिकृत बसथांबा नसलेल्या ठिकाणी बस थांबवून प्रवाशांची चढ-उतार सुरू असल्याने, ‘नियम सामान्य वाहनचालकांसाठी आणि एस.टी.साठी वेगळे?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कोंडी रोखण्यासाठी तातडीच्या कारवाईची मागणी

बस थांबविण्याची ठिकाणे निश्चित करावीत, अधिकृत बसथांब्याशिवाय रस्त्यावर बस उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

विशेषतः रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांसाठी मार्ग नेहमी मोकळा राहील, याची व्यवस्था करण्याची गरज आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Back to top button