१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक मासाळ कुटुंबीयांसह पोलिसांच्या ताब्यात; बारामतीत खळबळ
आरोपांची निष्पक्ष चौकशी होणार का?

१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक मासाळ कुटुंबीयांसह पोलिसांच्या ताब्यात; बारामतीत खळबळ
आरोपांची निष्पक्ष चौकशी होणार का?
बारामती वार्तापत्र
नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ यांनी १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर इशारा देणारे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर बारामती पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. मासाळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून, या कारवाईमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे.
मासाळ यांनी गेल्या काही महिन्यांपासून स्वतःसह कुटुंबीयांना अपमान, त्रास आणि भीतीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात बारामती शहर पोलिस ठाण्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे विविध तारखांना तक्रारी अर्ज दिल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
२९ एप्रिल, २५ मे, ६ जुलै आणि २१ जुलै २०२६ रोजी दिलेल्या अर्जांचा उल्लेखही मासाळ यांनी केला आहे. तसेच फेसबुक संदेश, व्हॉट्सॲप चॅट, स्क्रीनशॉट, कॉल रेकॉर्डिंग आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करत मासाळ यांनी पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींनाच न्याय मिळतो का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
इशाऱ्यानंतर पोलिसांची तातडीची कारवाई
मासाळ यांच्या पत्रानंतर पोलिस प्रशासनाने परिस्थिती गांभीर्याने घेतली. कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच मासाळ आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र मासाळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना नेमके कुठे ठेवण्यात आले आहे, तसेच पोलिसांनी कोणत्या कायदेशीर प्रक्रियेनुसार ही कारवाई केली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
आरोपांची निष्पक्ष चौकशी होणार का?
या प्रकरणात एकीकडे मासाळ आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, तर दुसरीकडे त्यांनी केलेल्या तक्रारी आणि आरोपांची निष्पक्ष चौकशी होणेही आवश्यक आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन आता या प्रकरणात पुढील कोणती भूमिका घेणार, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.






