स्थानिक

बारामती बस स्थानकाच्या पाणीटंचाईवर कायमचा उपाय; विजय काळे यांच्या स्वनिधीतून बोरवेल

“फक्त आश्वासन नाही, तर कृतीतून दिलेला शब्द पूर्ण,”

बारामती बस स्थानकाच्या पाणीटंचाईवर कायमचा उपाय; विजय काळे यांच्या स्वनिधीतून बोरवेल

“फक्त आश्वासन नाही, तर कृतीतून दिलेला शब्द पूर्ण,”

बारामती वार्तापत्र 

राज्यातील स्वच्छ व सुंदर बस स्थानकांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या बारामती बस स्थानकाच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व अजितदादा प्रेमी विजय काळे यांनी स्वतःच्या स्वनिधीतून बस आगार परिसरात बोरवेल करून दिल्याने स्थानकातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.

बारामती बस स्थानकाला प्रथम क्रमांकाचा मान मिळाल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा पवार यांनी स्थानकाला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले होते. यावेळी स्थानकात पाण्याची कमतरता असल्याची बाब आगार प्रशासनाने त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यावेळी उपस्थित असलेल्या विजय काळे यांनी कोणताही विलंब न लावता, “या ठिकाणी बोरवेलची व्यवस्था मी माझ्या स्वखर्चातून करून देतो,” अशी ग्वाही दिली होती.

दिलेला शब्द पाळत विजय काळे यांनी बारामती बस स्थानक परिसरात बोरवेलची उभारणी पूर्ण केली. त्यामुळे स्थानकातील स्वच्छता, प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा तसेच दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचे सांगितले जात आहे.

बोरवेलच्या पूजन कार्यक्रमाला बारामती आगाराचे व्यवस्थापक प्रवीण शिंदे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक वृषाली तांबे, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन शेठ सातव, पंचायत समितीचे अध्यक्ष किरण तावरे, बारामती तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष किशोर फडतरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी विजय काळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात अव्वल ठरलेल्या बारामती बस स्थानकाला आता पुरेशा पाणीपुरवठ्याची जोड मिळाल्याने प्रवाशांच्या सुविधांमध्ये आणखी भर पडणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

“फक्त आश्वासन नाही, तर कृतीतून दिलेला शब्द पूर्ण,” अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. स्थानकाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यास सार्वजनिक सुविधांमध्ये अधिक सुधारणा होऊ शकते, याचे हे उदाहरण मानले जात आहे.

Back to top button