मोहाला बळी न पडता दिला नकार; बसमध्ये सापडलेले दागिने व रोख रक्कम बारामती पोलिसांच्या ताब्यात
दोन्ही सीटच्या मधोमध त्यांना एक छोटे पाकीट आढळून आले.

मोहाला बळी न पडता दिला नकार; बसमध्ये सापडलेले दागिने व रोख रक्कम बारामती पोलिसांच्या ताब्यात
दोन्ही सीटच्या मधोमध त्यांना एक छोटे पाकीट आढळून आले.
बारामती वार्तापत्र
आजच्या स्वार्थी मानल्या जाणाऱ्या काळातही प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपणारी माणसे समाजात आहेत, याचा प्रत्यय बारामतीत घडलेल्या एका प्रेरणादायी घटनेतून आला आहे.
सौ. गौरी अनिल दाने (वय २६) आणि गौरव आसलकर हे दोघे अहिल्यानगर आगाराच्या एमएच १४ बीटी ३४९१ क्रमांकाच्या बसमधून प्रवास करत होते. फलटण बसस्थानक सोडल्यानंतर त्यांना झोप लागली. काही वेळाने जाग आल्यानंतर दोन्ही सीटच्या मधोमध त्यांना एक छोटे पाकीट आढळून आले.
पाकीट उघडून पाहिले असता त्यामध्ये ६ हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे असल्याचा संशय असलेले कानातील दोन झुमके असल्याचे दिसून आले. मात्र, मोहाला बळी न पडता त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखत हा मुद्देमाल बारामती शहर पोलीस ठाण्यात जमा केला.
सदर वस्तूंचा खरा मालक शोधून त्याला योग्य खातरजमा करून मालमत्ता परत मिळावी, या उद्देशाने त्यांनी हा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यांच्या या कृतीमुळे प्रामाणिकपणा आणि सामाजिक मूल्यांचे जिवंत उदाहरण समाजासमोर आले आहे.
या प्रामाणिक कृतीबद्दल बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी गौरी दाने आणि गौरव आसलकर यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. तसेच, नागरिकांनी सापडलेली मालमत्ता संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गौरी दाने आणि गौरव आसलकर यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा हा समाजातील नैतिक मूल्यांचे जतन करणारा आदर्श असून अशा सजग नागरिकांमुळे समाज अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुसंस्कृत बनत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.






