येळकोट येळकोट जय मल्हार..! जेजुरीत भाविकांची प्रचंड गर्दी, लाखो भाविकांनी घेतले कुलदैवताचे दर्शन
सकाळी सात वाजता सोहळा कऱ्हा नदीवरील रंभाई शिंपीन स्नान घाटावर पोहोचला

येळकोट येळकोट जय मल्हार..! जेजुरीत भाविकांची प्रचंड गर्दी, लाखो भाविकांनी घेतले कुलदैवताचे दर्शन
सकाळी सात वाजता सोहळा कऱ्हा नदीवरील रंभाई शिंपीन स्नान घाटावर पोहोचला
जेजुरी; प्रतिनिधि
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीत सोमवती अमावस्यानिमित्त प्रचंड गर्दी केली होती. सुमारे तीन लाखाहून अधिक भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. दीड वर्षानंतर जेजुरीत सोमवती यात्रा भरत असल्याने भाविकांची गर्दी झाली होती.
काल रविवारी दुपारी १२.२० वाजेपासून अमावस्या सूरु झाली होती. ती आज सोमवारी सकाळी ८.२४ वाजेपर्यंत सोमवती अमावसेचा पर्व काळ असल्यामुळे ग्रामस्थानी रविवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजता पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रात्री दोन वाजता मानकरी पेशवे यांच्या इशारतीत सोहळ्याने कऱ्हा नदीकडे प्रस्थान ठेवले.
पालखीचे खांदेकरी मानकरी आणि ग्रामस्थांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात पालखी उचलली. यावेळी उपस्थित भाविकांनी भंडार खोबऱ्याची मुक्त हस्ताने उधळण केली. देवाचा जयघोष आणि भंडार खोबऱ्याच्या उधळणीत पालखी मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालीत बालदारीत नेण्यात आली. या ठिकाणी देवाचे पुजारी उपाध्ये यांनी कुलदैवत मल्हारी म्हाळसाकांताच्या उत्सवमूर्ती विधिवत बालदरीत आणल्या. त्या ठिकाणी उत्सव मूर्तिना पालखीत स्थानापन्न करण्यात आले. यानंतर देवाचा पालखी सोहळा कर्हेकडे निघाला. मुख्य प्रवेश द्वारातून सोहळ्याने गड कोटाबाहेर प्रस्थान ठेवले. नंदी चौकातून सोहळा चिंचबागेतील होळकर ट्रस्ट च्या गौतमेश्वर मंदिरात आला. या ठिकाणी होळकरांचा मान स्वीकारून सोहळा जानाई मंदिर चौक, शहरातील मुख्य शिवाजी महाराज चौक मार्गे शहराबाहेर कोथळे मार्गांवरून कर्हेकडे निघाला. सकाळी सात वाजता सोहळा कऱ्हा नदीवरील रंभाई शिंपीन स्नान घाटावर पोहोचला. येथे उत्सव मूर्तिना विधिवत कऱ्हा स्नान घालण्यात आले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले.
दीड वर्षांनी आलेली सोमवती यात्रा, अधिक महिन्यातील अमावस्या यामुळे भाविकांनी रविवार पासून जेजुरीत मुक्कामी गर्दी केलेली होती. संपूर्ण रात्रभर जेजुरी नगरीत कुळधर्म कुलाचाराचे धार्मिक विधी सूरु होते. संपूर्ण शहर पिवळ्या जर्द भंडाऱ्याने न्हाऊन निघाल्याने सोन्याच्या जेजुरीचा प्रत्यय उयेतोय होता.
उत्सव काळात मार्तंड देव संस्थान चे प्रमुख विश्वस्त अड विश्वास पाणसे, विश्वस्त मंगेश घोणे, अड पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, पोपट खोमणे, अभिजित देवकाते, अनिल सौन्दडे, व्यवस्थापक आशिष बाठे आदींनी सोहळा आणि आलेल्या भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून जातीने लक्ष घालून नियोजन केले होते. जेजुरी पोलिसांनी ही चोख बंदोबस्त ठेवला होता.






