क्राईम रिपोर्ट

७८ लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद

पाच वर्षे पोलिसांना गुंगारा; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

७८ लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद

पाच वर्षे पोलिसांना गुंगारा; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

शिक्रापूर; प्रतिनिधि

सुमारे ७८ लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकत मोठे यश मिळवले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना हुलकावणी देणारा आरोपी तीन दिवसांच्या पाठलागानंतर चाकण येथून पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
दि. ८ जुलै २०२१ रोजी बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी वाहतूक व साठवणूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ७८ लाख रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी दि. ९ जुलै २०२१ रोजी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते याच्यासह एकूण १३आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र, गुन्हा दाखल होताच आरोपी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते (वय २२ वर्षे) रा.गवते वस्ती, चाकण,ता.खेड) हा फरार झाला होता. गुन्हा घडला त्यावेळी तो गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याचा अनेकदा शोध घेतला, मात्र तो सतत ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा देत होता.
दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असता आरोपी चाकण परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तीन दिवस सातत्याने पाठलाग करून आणि तांत्रिक तसेच स्थानिक माहितीच्या आधारे सापळा रचत आरोपीला गवते वस्ती, चाकण येथून ताब्यात घेतले.
पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आल्याने गुटखा तस्करीविरोधातील कारवाईला आणखी बळ मिळाले आहे. अटक आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे. या गुन्ह्याशी संबंधित इतर बाबी, आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या नेटवर्कचा तपासही पोलीस करीत आहेत.
गुन्हा कितीही जुना असला, तरी कायद्याचा हात लांब असतो याची प्रचिती पुन्हा एकदा या कारवाईतून आली असून पाच वर्षे फरार राहिलेला आरोपी अखेर शिक्रापूर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह के अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख सोमनाथ कचरे पोलीस अंमलदार गणेश येळवंडे नवनाथ केंद्रे मयूर कुंभार यांनी केली आहे.

Back to top button