इंदापूर

धरणाचा इशारा! उजनीतून 70 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग; भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मासेमारीसाठी जाणे धोकादायक ठरू शकते

धरणाचा इशारा! उजनीतून 70 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग; भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मासेमारीसाठी जाणे धोकादायक ठरू शकते

इंदापूर;प्रतिनिधि

स्थानिक पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून, पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आज (31 जुलै) दुपारी 1.30 वाजल्यापासून उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात तब्बल 70 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून, पुढील परिस्थितीनुसार या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Nधरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याने भीमा नदीकाठच्या गावांसह सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात प्रवेश करणे, पोहण्यासाठी किंवा मासेमारीसाठी जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये, असे स्पष्ट आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

नदीकाठावरील जनावरे, शेती साहित्य, पंप, वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायती, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने गावोगावी नागरिकांना सावध करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, असेही सांगण्यात आले आहे.
—–
उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी सांगितले की, धरणातील पाण्याची आवक कायम असल्याने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. आवश्यकतेनुसार विसर्गात आणखी वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
——
प्रशासनाचे आवाहन :

* भीमा नदीपात्रात कोणत्याही कारणासाठी उतरू नका.
* नदीकाठावरील जनावरे व शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवा.
* लहान मुलांना नदीकाठाकडे जाऊ देऊ नका.
* ग्रामपंचायत व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा.
* संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन सतर्क राहा.

Back to top button