क्राईम रिपोर्ट

बारामती पोलिसांची मोठी कारवाई!;मोटारसायकल चोरीचा मास्टरमाईंड जेरबंद; १३ बुलेटसह १९ दुचाकी पोलिसांच्या ताब्यात

वाहनांची अंदाजे किंमत ३० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद

बारामती पोलिसांची मोठी कारवाई!;मोटारसायकल चोरीचा मास्टरमाईंड जेरबंद; १३ बुलेटसह १९ दुचाकी पोलिसांच्या ताब्यात

वाहनांची अंदाजे किंमत ३० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद

बारामती वार्तापत्र 

बारामती शहर तसेच बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यात पोलिसांना यश आले आहे. सैराट मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून सुमारे ३० लाख रुपये किमतीच्या १९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईत बारामती शहर व बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले होते.

दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक संशयित चोरीची मोटारसायकल घेऊन बारामती शहर परिसरात फिरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव समाधान बाळू काकडे (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या मोटारसायकलींबाबत चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीच्या वाहनांवर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसेवा तसेच एसटी महामंडळाचे लोगो लावून ती वाहने विक्रीसाठी वापरण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले आहे.

आरोपीकडून १३ बुलेट मोटारसायकली व इतर ६ मोटारसायकली, अशा एकूण १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या वाहनांची अंदाजे किंमत ३० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या कारवाईमुळे बारामती शहर व बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेले ११ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीतील रिमांडमध्ये असून, त्याच्याकडून आणखी चोरीच्या वाहनांबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

कारवाईत सहभागी पथक : स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Back to top button