सभासदांच्या हितासाठी मोठे निर्णय; बारामतीतील वीर सावरकर स्वीमर्स क्लबच्या वार्षिक सभेत विकासाचा रोडमॅप
जलतरणपटूंच्या गुणवत्तेला सलाम!

सभासदांच्या हितासाठी मोठे निर्णय; बारामतीतील वीर सावरकर स्वीमर्स क्लबच्या वार्षिक सभेत विकासाचा रोडमॅप
जलतरणपटूंच्या गुणवत्तेला सलाम!
बारामती वार्तापत्र
सभासदांचे हित, जलतरणपटूंच्या भविष्यातील संधी आणि क्लबचा सर्वांगीण विकास यांना प्राधान्य देत आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच क्लबच्या स्वमालकीची जागा खरेदी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रतिपादन वीर सावरकर स्वीमर्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी केले.
वीर सावरकर स्वीमर्स क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडली. या सभेत क्लबच्या आगामी वाटचालीसह सभासदांच्या सुविधा, जलतरणपटूंच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि क्लबच्या विकासाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
क्लबच्या वतीने नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्विमिंग टॅंक लवकरच सभासदांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी जुन्या स्विमिंग टॅंकचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे डॉ. तांबे यांनी सांगितले. आजीव सभासदांसाठी वार्षिक शुल्क २ हजार रुपये करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जलतरण क्षेत्रात बारामतीतील खेळाडूंना अधिक चांगल्या संधी मिळाव्यात, त्यांना दर्जेदार प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. भविष्यात क्लबची स्वतःची जागा असावी, या उद्देशाने जागा खरेदी करण्याच्या दिशेनेही प्रयत्न केले जाणार असल्याचे डॉ. तांबे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विविध जलतरण स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून क्लबचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सभासद व जलतरणपटूंचा यावेळी सत्कार करण्यात आला. खेळाडूंच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सभेत क्लबचा वार्षिक अहवाल सचिव विश्वास शेळके यांनी सादर केला. क्लबच्या कामकाजाचा आढावा तसेच आगामी उपक्रमांची माहिती सभासदांसमोर ठेवण्यात आली.
या वेळी सल्लागार सदाशिव सातव, राजेंद्र जाधव, महेंद्र ओसवाल, सचिव विश्वास शेळके, खजिनदार मिलिंद अत्रे, संचालक दीपक बनकर, अमोल गावडे, बाळासाहेब टाटिया, अॅड. पंढरीनाथ नाळे, अनिल सातव, शर्मिष्ठा जाधव यांच्यासह क्लबचे सभासद उपस्थित होते.
सभेत सचिन भूतकर, दिलीप शिंदे, पांडुरंग कचरे, किरण शिंदे, नगरसेवक राहुल वाघोलीकर, राजाभाऊ भोईटे, डॉ. वाघमोडे, पत्रकार धनु सस्ते आदींनी विविध प्रश्न व सूचना मांडल्या. सभेचे सूत्रसंचालन सावळे पाटील यांनी केले, तर आभार व्यवस्थापक सुनील खाडे यांनी मानले.






