“1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले, त्यांनी काय काम केलं ते पाहा, आणि मी केलेलं काम पाहा,अजित पवारांचे बारामतीत काकांना पुन्हा आव्हान
एक टक्का दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा तरतूद केली आहे

“1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले, त्यांनी काय काम केलं ते पाहा, आणि मी केलेलं काम पाहा,अजित पवारांचे बारामतीत काकांना पुन्हा आव्हान
एक टक्का दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा तरतूद केली आहे
बारामती वार्तापत्र
बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी विधानसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणूक प्रचारापासून अजित पवार हे बारामतीमध्ये केलेल्या विकासकामांची उजळणी करत आहेत. अजित पवार बारामतीत विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतरही त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची माहिती वारंवार देत असतात, आज बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात तर त्य्यांनी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून कालपर्यंतच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत झालेल्या विकासकामांची तुलना केली.
“1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले, त्यांनी काय काम केलं ते पाहा, आणि मी केलेलं काम पाहा,” असे म्हणत बारामतीचे आमदार तथा उपमुख्यमंत्री अजित पवार काका शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
अजित पवारांनी मागील आठवड्यात बीडमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना चुलत्याच्या कृपेने सर्वकाही मिळालं आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात चर्चेला उधाण आलं होतं, तर आता बारामतीमध्ये काकांनी देखील माझ्यासारखी विकासकामे केली नाही, असा अप्रत्यक्ष टोला अजित पवारांनी शरद पवारांना लगावला असल्याची चर्चा होत आहे.
अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत दिव्यांगांना सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार म्हणाले की, ‘बजेटमध्ये डीपीडीसीला 22,000 कोटी दिले. त्यातला एक टक्का दिव्यांगांसाठी खर्च करण्याची तरतूद केली आहे. दिव्यांगांना सहानभूती नको तर समान संधी पाहिजे.’
बारामतीचे आमदार तथा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘बारामतीत मी आतापर्यंत जेवढं काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. 1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले, त्यांनी काय कामे केलं ते पाहा आणि मी केलेलं काम पाहा. मी अजूनही काम करणार आहे, असे म्हणत अजित पवारांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
‘तो’ ताप माझ्यावर निघाला तर अवघड व्हायचे
अजित पवार पुढे म्हणाले की, उन्हात कार्यक्रम आहे. सावलीत भाषण असतं तर बरं झालं असतं. उन्हात भाषण करायचं बरं वाटत नाही. बीडीओंना म्हटलं होतं, सावलीत कार्यक्रम घ्यायचा ना. उन्हात तुम्ही तापत आहात, तो ताप माझ्यावर निघाला तर अवघड व्हायचे, असे मिश्कील वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
…तर मी मकोका लावीन
दिव्यांगांना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. मी काय कायम तुमच्यासोबत नाही. काळाच्या पुढं काही करता येत नाही. पण, काम करताना नीट करतो. त्यामुळे पुढची लोकं म्हणतील, चांगलं काम केलं. परवा माझ्याकडे एक क्लिप आली. सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये एकाला मारहाण केली. कुत्र्याला जसं मारत असतील तसंच मारलं. मी पोलिसांना सांगितलं कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. हे जर पुढे असंच चालत राहिलं तर मी मकोका लावीन, असा इशारा देखील अजित पवारांनी यावेळी दिला.
अरे काय पोटात घ्या पोट फुटायला लागलं
अजित पवार पुढे म्हणाले की, आपली मुलं काय करत आहेत? हे लक्ष ठेवणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पालकांनी पार पाडावी. मला काही लोकांचा फोन येतो की, दादा पोटात या, पोटात घ्या. अरे काय पोटात घ्या? पोट फुटायला लागलंय. ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही, असं सांगायला. सगळ्यांना नियम सारखाच आहे, असे यावेळी अजित पवारांनी ठणकावून सांगितले