बारामती विमान अपघात प्रकरण:पिंकी माळीच्या वडिलांनी विमान तपासाबाबत काय आरोप केले?
अपघाताच्या तपासाची नेमकी दिशा काय आहे

बारामती विमान अपघात प्रकरण:पिंकी माळीच्या वडिलांनी विमान तपासाबाबत काय आरोप केले?
अपघाताच्या तपासाची नेमकी दिशा काय आहे.
बारामती वार्तापत्र
अजित दादांसोबत झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या वडिलांनी आज बारामतीत येऊन माध्यमांसमोर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या भेटीमुळे प्रकरणाला नव्याने वाचा फुटली आहे.
फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज त्यांचे वडील शिवकुमार माळी हे बारामती येथे शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आले होते.
या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना तपास प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.शिवकुमार माळी यांनी सांगितले की, अपघाताला काही दिवस उलटून गेले असतानाही तपास यंत्रणांकडून अद्याप त्यांच्याशी कोणताही अधिकृत संपर्क साधण्यात आलेला नाही.
अपघाताच्या तपासाची नेमकी दिशा काय आहे, कोणत्या बाबींची चौकशी सुरू आहे, याबाबत कुटुंबाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. या दुर्लक्षामुळे कुटुंबीयांची चिंता आणि संभ्रम वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय त्यांनी एक गंभीर संशय व्यक्त करत अपघातग्रस्त विमानात इंधनाने भरलेले कॅन होते का, असा प्रश्न उपस्थित केला. जर असे कॅन विमानात असतील, तर ते सुरक्षा नियमांचे उल्लंघन तर नाही ना, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. या मुद्द्यामुळे दुर्घटनेमागील कारणांबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी अधिकृत तपास सुरू असल्याची माहिती संबंधित यंत्रणांकडून देण्यात आली असली, तरी कुटुंबीयांना थेट माहिती न दिल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
शिवकुमार माळी यांनी निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीची मागणी करत, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तपास अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






